होटगी : प्रतिनिधी
सादेपूर हद्दीतील एका वस्तीवर मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन वस्त्या जळून खाक झाल्या. वस्ती पेटताच वेळीच आतील लोक बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. मात्र यात चारजण किरकोळ भाजल्याने जखमी झाले. दोन कुटुंबे उघड्यावर पडली असून, त्यांचे नऊ ते दहा लाखांचे नुकसान झाले.
राजश्री सातप्पा बहिरगोंडे, अंबूबाई अप्पासाहेब सुतार, अप्पासाहेब राजप्पा सुतार व विठ्ठल यलगोंडा कांबळे (सर्वजण रा. सादेपूर) अशी जखमींची नावे आहेत. मंद्रुप पोलिसांत याची नोंद झाली आहे.
दावल मलिक देवस्थानाजवळ सातप्पा श्रीमंत बहिरगोंडे यांची शेती आहे. बहिरगोंडे कुटुंबासह त्यांच्या शेतात कामास असलेले अप्पासाहेब सुतार कुटुंबासह पत्र्याच्या वस्तीत राहतात. सोमवारी रात्री सुतार यांची पत्नी अंबूबाई या सिलिंडरचे रेग्युलेटर चालू ठेवून झोपल्या होत्या. पहाटे सव्वातीन वाजता लाईट चालू करताच सिलेंडरने पेट घेतला. कमी गॅस असल्याने मोठा स्फोट झाला नाही, पण आग भडकली. सुतार यांनी पत्नीला तातडीने बाहेर काढले. आरडाओरडा करताच बहिरगोंडे कुटुंबातील सर्वजण बाहेर पडले. बहिरगोंडे यांनीही नवीन गॅसटाकी आणून ठेवली होती. त्या भागासही आगीने वेढले. सिलिंडरचा स्फोट होईल म्हणून सर्वजण दूर पळाले आणि काही वेळातच मोठा स्फोट झाला. वस्तीवरचा पत्रा फाटून आगीच्या ठिणग्या शंभर ते दीडशे फुटांवर जाऊन पडल्या. यामुळे बाजूस असलेला ऊस पेटला. द्राक्षबागेलाही झळ पोहोचली. कडब्याची गंज पेटल्याने दोन हजार कडबा जळाला. आगीत दोन्ही कुटुंबाचे सोने, रोख रक्कम, कपडे, धान्य, संसारोपयोगी साहित्य, गिरणी व द्राक्षांचे औषध जळाले. त्यात नऊ ते दहा लाखांचे नुकसान झाले. तलाठी व मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.