Mon, Jul 15, 2019 23:38होमपेज › Solapur › योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींवर अंत्यसंस्कार

योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींवर अंत्यसंस्कार

Published On: Dec 23 2017 2:14AM | Last Updated: Dec 22 2017 11:32PM

बुकमार्क करा

होटगी ः प्रतिनिधी

होटगी मठाचे मठाधिपती तपोरत्नं श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्यावर शुक्रवारी  हजारो भक्तांच्या उपस्थितीत होटगी मठ परिसरात साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी जगद्गुंरूसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.  होटगी ब्रृहन्मठात त्यांच्यावर धार्मिक कार्यक्रमाने विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता होटगी गावांत महाराजांचे पार्थिव आणण्यात आले. गावात आगमन होताच भाविकांनी पार्थिवावर पुष्पवृष्टी करून आदरांजली वाहिली. गावातील मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गावातील प्रमुख मार्गांवरून पार्थिवाची मिरवणूक काढून अंत्यदर्शनासाठी पार्थिव होटगी बृहन्मठात आणण्यात आले.

होटगी बृहन्मठात वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या डाव्या बाजूला त्यांचे समाधी स्थळ बनविण्यात आले आहे. या समाधी स्थळाचेदेखील भाविकांनी दर्शन घेतले. या अंत्यविधी कार्यक्रमासाठी काशीपीठाचे जगद्गुरू 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल पीठाचे जगद्गुरू 1008 चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, होटगी मठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, गौडगाव मठाचे जय सिद्धेश्‍वर महाराज, अफजलपूर मठाचे विश्‍वराध्य मळेंद्र शिवाचार्य महाराज, माळकवठेचे पंचाक्षरी शिवाचार्य महाराज, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य महाराज, नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महाराज, मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य महाराज, वडांगुळीचे पंडिताराध्य शिवाचार्य महाराज, चिडगुप्पाचे गुरूलिंग शिवाचार्य महाराज उपस्थित होते.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. सिद्धाराम म्हेत्रे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आ. सि.ना. आलुरे गुरुजी,  सिद्रामप्पा पाटील, रवी पाटील, रतीकांत पाटील,  काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंडा-पाटील, दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक उदय पाटील, जि.प. सदस्य अण्णाराव बाराचारे, अमर पाटील, पं.स. माजी सभापती गुरूसिद्ध म्हेत्रे, नरेंद्र काळे, रामप्पा चिवडशेट्टी, हरिष पाटील उपस्थित होते. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या अंत्यविधीसाठी आलेल्या भाविकांसाठी होटगी मठाकडून महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. अंत्यविधीचे पौरोहित्य शिवयोगी शास्त्री होळीमठ, बसवराज खंडाळ, कल्लय्या गणेचारी, परमेश्‍वर हिरेमठ, सिद्धय्या हिरेमठ यांनी केले.  पोलिस अधीक्षक वीरेश प्रभ्ाू यांनी स्वत: लक्ष घालून मठ परिसर आणि समाधी परिसराची पाहणी करून तगडा पोलिस बंदोबस्त लावला होता.