होमपेज › Solapur › रुग्णालयांची होणार तपासणी; जिल्हाधिकारी नेमणार समिती

रुग्णालयांची होणार तपासणी; जिल्हाधिकारी नेमणार समिती

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:45PM

बुकमार्क करा

सोलापूर :  प्रतिनिधी

धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असणार्‍या इस्पितळातून गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात का नाही, याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्‍त केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा या समितीत समावेश असेल. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज याबाबतच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक    डॉ. सुमेध अणदूरकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, सह धर्मादाय आयुक्‍त गीतांजली कोरे आदी उपस्थित होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांसाठी दहा टक्के राखीव खाटा ठेवण्यात येतात. याबाबत माहिती दर्शनी भागात लावली जावी. पण अशा माहितीचे फलक नसल्याचे आढळून येते. सर्व रुग्णालयांत जमा होणार्‍या देयकाच्या दोन टक्के रक्कमही बाजूला काढून ठेवली जाते का?  त्यामधून गरीब रुग्णांवर उपचार केले जातात का याची तपासणी केली जावी.

यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी धर्मादाय दवाखान्यांची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येईल.  ही समिती सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची तपासणी करेल आणि अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करेल, असे सांगितले.