Tue, Mar 26, 2019 11:40होमपेज › Solapur › होनसळचे सहा सदस्य अपात्र

होनसळचे सहा सदस्य अपात्र

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 9:20PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी  


उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी निवडणूक झाल्यानंतर विहित नमुन्यात आणि वेळेत निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी विद्यमान सरपंच, उपसरपंचासह सहा सदस्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविले आहे.

होनसळ गावचे सूर्यकिरण भोसले यांनी या सदस्यांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर पडताळणी करून जिल्हाधिकार्‍यांनी बुधवारी हा आदेश दिला असून, यामध्ये सरपंच सरस्वती स्वामी, उपसरपंच शीतल खेडकर यांच्यासह विलास पवार, हालीमाबी शेख, छाया पवार, बसप्पा उबाळे या सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे सात सदस्यांची ग्रामपंचायत असणार्‍या होनसळ ग्रामपंचायतीमध्ये आता केवळ एक सदस्य शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार आता कसा होणार की सर्व सूत्रे प्रशासकाकडे जाणार याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.
उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी मात्र याविषयी आपल्याकडे अद्याप कसलाही आदेश आला नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांचा आदेश येताच या जागा रिक्‍त झाल्याचा अहवाल तयार करून पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.