Fri, Aug 23, 2019 23:23होमपेज › Solapur › स्वातंत्र्यपूर्वकाळातील शेकडो ग्रंथ जपणारा व्रतस्थ 

स्वातंत्र्यपूर्वकाळातील शेकडो ग्रंथ जपणारा व्रतस्थ 

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:18PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी 

सत्तरीच्या घरात असणारे अन्सार साहेब दरवर्षी उर्दू किताब मेलामध्ये आपला स्टॉल लावतात. त्यांना कोणते डिजिटल ग्रंथ विकायचे नसतात. त्यांच्या पुस्तकांना कोणते आकर्षक कव्हर नसते. त्यांचे ग्रंथ फाटलेले असतात. अत्यंत जीर्ण पुस्तकांचा ढिग त्यांच्या दुकानात पाहायला मिळतो. तरीही या जुन्या जीर्ण पुस्तकांच्या दुकानात ग्राहक गर्दी करतात. इतरांपेक्षा अधिक किमतीने अन्सारी साहेब पुस्तकांच्या झेरॉक्स प्रतींची  विक्री करतात. हे सर्व आश्‍चर्यकारक असले तरीही उर्दू किताब मेलातील हे दृश्य सुखद आहे.

 ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक पॅकेजिंग केले जाते.  कित्येक वेळा या पॅकेजिंगच्या आकर्षकपणाला भुलून ग्राहक रद्दी मालदेखील खरेदी करतात. पण अन्सार साहेबांच्या स्टॉलवर कोणतेच आकर्षक पॅकेज नसते. उलट रद्दी आणि पाहायला कुरुप वाटणार्‍या पुस्तकांच्या ढिगार्‍यात अन्सार साहेब उभे असतात. कारण काय तर त्यांच्याकडे स्वातंत्र्यपूर्वीच्या अनेक दुर्मीळ ग्रंथांचा संचय पाहायला मिळतो. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे अल् हिलाल वर्तमानपत्राच्या कित्येक मूळ प्रति त्यांच्या संग्रहात आहेत. वर्‍हाडच्या इतिहासाचे अनेक दुर्मीळ ग्रंथ त्यांच्याकडे आहेत. मोगलकालीन बरेच संदर्भग्रंथ त्यांनी जपून ठेवले आहेत. या संदर्भग्रंथाच्या प्रतींची झेरॉक्स खरेदी करण्यासाठी वाचकांकडून प्रचंड गर्दी केली जाते. काही जिज्ञासू वाचक हा संग्रह पाहतात. तर काही संशोधक ते खरेदी करतात. शासनाच्या कोणत्याही मदतीविना अन्सार साहेब आणि जावेद खान यांची रय्यान इंडियन हेरिटेज आणि इंडियन मुस्लिम हेरिटेज प्रोजेक्ट ही संस्था हे काम अनेक वर्षांपासून करत आहे.