Fri, Apr 26, 2019 02:12होमपेज › Solapur › ‘हिंगण’ नामशेष होण्याच्या मार्गावर

‘हिंगण’ नामशेष होण्याच्या मार्गावर

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:37PMसांगोला : वार्ताहर

वाढते शहरीकरण व त्याचबरोबर शेतीच्या सुधारणांमुळे अनेक वनस्पती, झाडे दुर्मीळ होत चालले आहेत. वाढती लोकसंख्या व पडिक शेतजमिनीचा वाढता वापर याचा दुसरा परिणाम म्हणून अनेक दुर्मीळ वनस्पती आणखीनच दुर्मीळ होत आहेत. यापैकीच एक ‘हिंगण’ ही काटेरी वनस्पती होय. जी सध्या शेताच्या बांधासह वनातूनही हद्दपार होत असल्याचे चित्र दिसून येते. 

पूर्वीच्या काळी कपडे धुण्याच्या साबणाचा वापर काही ठराविक लोकांमध्येच होता. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांमध्ये अनेक वेळा हिंगण याचा वापर साबण म्हणून केला जात होता. ज्याच्या माध्यमातून कपडे धुण्याचे काम करण्यात येत होते. ‘हिंगण’ हे सहजासहजी उपलब्ध होत असल्यामुळे त्याचा वापर पूर्वी मोठ्या प्रमाणात होत होता. त्याचबरोबर लहान मुले हिंगण या काटेरी वनस्पतीला लागणार्‍या फळाचा वापर भवरा म्हणून करीत असे. या वनस्पतीमुळे दुष्काळी भागात वृक्षांची वाढत राहणारी संख्या कमी होऊ लागली आहे. हिंगण हे पाणी नसले तरी बरेच दिवस तग धरून राहू शकणारी वनस्पती आहे. त्यामुळे याचे जतन होणे काळाची गरज आहे.

माणदेशी परिसर विशेषत: सांगोला तालुक्यातून ही काटेरी वनस्पती आता काळाच्या पडद्याच्या आड जाते की काय? अशीच शंका वनप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. ही जरी काटेरी वनस्पती असली तरी त्याचे झाड मोठे, पाने हिरवी व मध्यम आकाराची लांबट असतात.  हिरवट पिवळ्या रंगाचे लहान टोकदार काटे या वनस्पतीला असल्यामुळे प्राणी, पशुपक्षी या काटेरी वनस्पतीपासून चार हात लांबच राहतात. परंतु याचा उपयोग इतर वनस्पतींप्रमाणे फारसा राहिला नसल्यामुळे ही वनस्पती आता सहजासहजी दिसून येत नाही. 

नवीन संशोधनामुळे अनेक वेगवेगळी सुगंधी साबणे बाजारात आली. त्यामुळे हा पूर्वीचा गोरगरीबांचा साबण हळूहळू पूर्णत: काळाच्या ओघात नष्ट होत आहे. हिंगणाच्या फळास ‘हिंगणमेटकं’ असेही ग्रामीण भागात ओळखले जाते. मात्र काळाच्या ओघात बदलत्या कालचक्रात हिंगणही नामशेष होत असल्याचे दिसते. अभ्यासक राजू सावंत गुरुजी म्हणाले की, काट्याला पाने फुटणारी एकमेव माणदेशी परिसरातील हिंगण ही वनस्पती असून फांदीवरही पाने फुटतात. हिंगणाच्या फळाला हिंगणमेटकं असे म्हणतात. दुर्मीळ होत असलेल्या या वनस्पतीचे संवर्धन होणे गरजेचे आहे.