Tue, Jul 16, 2019 11:36होमपेज › Solapur › ‘उजनी’वरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

‘उजनी’वरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 1:10AM बेंबळे : सिद्धेश्‍वर शिंदे

उजनी धरणाच्या वरील 19 धरणांपैकी केवळ 2 धरणांचा पाणीसाठा मृतसाठ्यात राहिला असून उर्वरित 17 धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक  पाऊस सुरू आहे.

वरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळा चालू झाल्यापासून आजपर्यंत एकूण 8 हजार 680 मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. त्यात पुण्यात गेले दोन-तीन दिवस चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे बंडगार्डन येथून मंगळवारपासून 1 हजार 458 क्युसेकचा विसर्ग चालू झाला आहे. त्यामुळे उजनी धरणात हळूहळू पाणी वाढत चालले आहे. या चार दिवसांत उजनीत 5.36 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 

पुणे, भीमाशंकर परिसरात पावसाने सुरुवात केल्यामुळे उजनी धरणात बंडगार्डन येथून सुरुवात झाली, तर दौंड येथून लवकरच विसर्ग चालू होणार आहे. 

उजनी धरणावरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेले पाच-सात दिवस  पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत आहे. तर उजनी धरणापैकी अनेक धरणांचा पाणीसाठा 40 ते 60 टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे येणार्‍या काही दिवसांत या धरणातून मोठ्या प्रमाणात उजनी धरणात विसर्ग येणार आहे.