Sat, Feb 23, 2019 10:14होमपेज › Solapur › पावसाने झोडपले!

पावसाने झोडपले!

Published On: Jun 23 2018 10:57PM | Last Updated: Jun 23 2018 10:33PMसोलापूर : प्रतिनिधी 

मुसळधार पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार हजेरी लावत सोलापूर शहराला झोडपून काढले. या पावसामुळे  अशोक चौक येथील महात्मा गांधी झोपडपट्टी, क्रांत झोपडपट्टी, बुधवार पेठ झोपडपट्टी, विजापूर रस्त्यावरील झोपडपट्टी क्रमांक एक या ठिकाणच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. रात्रभर घरातील पाणी बाहेर काढण्यातच नागरिकांची रात्र गेली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यातही  काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाची 54.2 मिलीमीटर इतकी नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. शुक्रवारी दुपारी प्रचंड उकाडा होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. साधारण दहा वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर सुमारे तासभर पावसाने उघडीप दिल्यावर पुन्हा अकराच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. प्रमुख रस्ते वगळता झोपडपट्ट्यांमध्ये पावसाळापूर्व कामे झालेली नाहीत. त्यामुळे तेथील नाले तुंबली आणि पावसाचे रस्त्यावरून वाहणारे पाणी अनेकांच्या झोपडीत शिरले.

महात्मा गांधी झोपडपट्टीतील घनदाट वस्ती आणि अतिशय निमुळत्या रस्त्यामुळे येथे पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे रस्त्यावरून वाहणार्‍या पाण्याची पातळी वाढून अनेकांच्या घरात पाणी गेले. हीच अवस्था व्हिवको प्रोसेस येथील क्रांती झोपडपट्टीमध्येही होती. विजापूर रस्त्यावरील झोपडपट्टी क्रमांक एक आणि बुधवार पेठ येथील काही घरांमध्येही पाणी शिरले.