होमपेज › Solapur › सोलापूरकर सुखावले; 13 मि.मी. पावसाची हजेरी

सोलापूरकर सुखावले; 13 मि.मी. पावसाची हजेरी

Published On: May 29 2018 1:27AM | Last Updated: May 29 2018 12:25AM



सोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरात सोमवारी दिवसभर तळपत्या उन्हाने होरपळ सुरू असतानाच सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरवासीयांची चांगलीच धावपळ उडाली. या पावसाची 13 मिलीमीटर इतकी हवामान खात्याकडे नोंद झाली होती. तसेच नैर्ऋत्य मोसमी पाऊसदेखील आजच केरळात दाखल झाल्याची शुभवार्ता ‘स्कायमेट’ने दिली होती. त्यामुळे शहरात पावसाची हजेरी व देशात मोसमी पावसाचे आगमन यामुळे सोलापूरकर चांगलेच सुखावले होते. 

हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील मेकुणू चक्रीवादळ पूर्णपणे क्षीण होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले होते. त्यामुळे नैऋत्य मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. कमी दाबाचे क्षेत्र पूर्व अरबी समुद्र आणि केरळ, कर्नाटक किनारपट्टीजवळ आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत मोसमी पाऊस केरळमधून देशात प्रवेश करेल. त्यानंतर 7 ते 10 जूनपर्यंत त्याचे राज्यात आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने केरळ किनार्‍यालगत अरबी समुद्रात 2.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात होते. त्यामुळे लक्षद्वीप बेटे, केरळ, कर्नाटक किनार्‍यावर दाट ढगांचे आच्छादन तयार झाले व या भागात पाऊस पडला, असेही सांगण्यात आले. सोलापूरसह जिल्ह्यातील काही भागांतदेखील पावसाने तुरळक स्वरुपात हजेरी लावली असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

मोसमी पावसाने 25 मे रोजी अंदमानात प्रवेश करून आनंदवार्ता दिली आहे. त्याच्या वाटचालीस सध्या पोषक वातावरण निर्माण होत असल्याने रविवारी अंदमान- निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांत मोसमी पाऊस दाखल झाला आहे. नियमित वेळेच्या सुमारे पाच दिवस उशिराने अंदमानात आलेल्या मोसमी पावसाची पुढील वाटचाल मात्र काहीशी वेगाने होणार असल्याची चिन्हे आहेत. केरळमधील आगमनानंतर  7 ते 10 जूनदरम्यान राज्यात त्याचे आगमन होण्याची शक्यतादेखील हवामान खात्याने वर्तविली आहे.