Fri, Jul 19, 2019 07:07होमपेज › Solapur › बोहाळी परिसरात वादळी वार्‍यासह पावसाचा तडाखा

बोहाळी परिसरात वादळी वार्‍यासह पावसाचा तडाखा

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 10:32PMपंढरपूर : प्रतिनिधी

गुरुवारी (दि.17) सायंकाळी आलेला वादळी वारा व अवकाळी पावसाने तालुक्यातील खर्डी व बोहाळी परिसराला झोडपून काढले. वादळी वार्‍याने पपई, अ‍ॅपल बोर, डाळिंब, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बोहाळी येथील शेतकर्‍यांची पपईची बाग मोडून पडून तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर  अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

बोहाळी, खर्डी, उंबरगाव, लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) परिसरात सलग दोन दिवस वादळी वारा व अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान आलेल्या वादळी वार्‍याने उतरणीला आलेल्या पपईच्या बागांचे मोठे नुकसान केले आहे. बोहाळी येथील अनिल नामदेव बाबर या शेतकर्‍यांची पपईची बाग वादळी वार्‍याने मोडून तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी व्ही. एम. शिवशरण यांनी पंचनामा केला आहे. तर सुभाष गायकवाड यांच्या पपईच्या बागेचेही मोठे नुकसान झाले आहे.

तर मधुकर ज्ञानू चंदनशिवे, रमेश एकनाथ जाधव, शिवाजी कुसुमडे, रामचंद्र गुरव (बोहाळी) यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तर शिवाजी कुसुमडे यांच्या जनावरांच्या गोठ्याची भिंत अंगावर पडून दोन बोकड मेली आहेत. वादळीवार्‍याला वेग जास्त असल्याने माळी डिपीला जोडणार्‍या मेन लाईनची तार तुटून रस्त्यावर पडली आहे. त्यामुळे या परिसरातील वीज बंद असल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे.

या वादळी वार्‍यात व अवकाळी पावसात बोरी बागेच्या फांद्या मोडून पडल्या असून झाडांचा मोहोर गळून पडला आहे. असाच प्रकार डाळिंबाच्या बाबतीत झाला आहे. डाळिंबाची फुले गळून फुलांचा सडा पडला आहे तर अनेक शेतकर्‍यांच्या डाळिंब बागावर फळे असणार्‍या बागेतील झाडे उन्मळून पडली आहेत. आंब्यांच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील डिश टिव्हींच्या छत्र्या, ढेपणीतील मका, कडब्याच्या पेंड्या दूरवर उडून गेल्या आहेत. मका, कडवळ ही उन्हाळी चारा पिके भुईसपाट झाली आहेत.

सकाळी व्यवहार झाला, सायंकाळी बाग भुईसपाट

बोहाळी येथील अनिल बाबर यांच्या पपईच्या बागेचा जागेवर 22 रु. प्रतिकिलो दराने व्यवहार झाला होता. मात्र, सायंकाळी वादळी वार्‍यात बाग मोडून पडल्याने 15 टन मालाचे किमान 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.