Sat, Apr 20, 2019 10:19होमपेज › Solapur › हेड कॉन्स्टेबल रमेश मांदेच्या बदलीसाठी रिपाइंचा मोर्चा

हेड कॉन्स्टेबल रमेश मांदेच्या बदलीसाठी रिपाइंचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुर्डुवाडी : प्रतिनिधी 

रिपाइं युवक आघाडीचे शहराध्यक्ष जितेंद्र गायकवाड यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच हेड कॉन्स्टेबल रमेश मांदे यांच्या बदलीसाठी रिपाइंच्यावतीने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

रिपाइं युवक आघाडीचे शहराध्यक्ष जितेंद्र गायकवाड हे 21 मार्च रोजी रफिक पटेल याच्यावर आलेल्या तक्रारीबाबत चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आले होते. त्यावेळी जितेंद्र गायकवाड यांनी रिपाइं युवक आघाडीचे शहराध्यक्ष असल्याचे सांगितले होते. पटेल यांच्या तक्रारीबाबत हेड कॉन्स्टेबल मांदे यांच्याकडे चौकशी केली असता, मांदे यांनी गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याच्या निषेधार्थ व मांदे यांच्या बदलीसाठी रिपाइंच्यावतीने पश्‍चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

पोलिस ठाण्यासमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. कार्यकर्त्यांनी रमेश मांदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याठिकाणी बापूसाहेब जगताप यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ ओहोळ, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष भीमराव वजाळे, उपाध्यक्ष जयवंत पोळ, तानाजी नागटिळक, अनिल जगताप यांची भाषणे झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी यांना निवेदन देण्यात आले. हेड कॉन्स्टेबल रमेश मांदे यांनी पोलिस ठाण्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. सामान्य नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात. दमदाटी करुन पिटाळून लावतात. त्यांच्या त्रासदायक वर्तवणुकीमुळे 20 नोव्हेंबर 2017 रोजी बदली झाली. मात्र अद्याप त्यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाणे सोडलेले नाही. त्यांची त्वरित बदली न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

कुर्डुवाडी पोलिस ठाण्यावर तिसरा मोर्चा

एका चोरीचा तपास लागत नसल्याने 20 वर्षांपूर्वी शहरवासीयांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यावेळी आंदोलकांनी पोलिस ठाण्याच्या फलकाला बांगड्यांचा हार घातला होता. 15 वर्षांपूर्वी बापूसाहेब जगताप यांच्या समर्थनात रिपाइंने मोर्चा काढला होता. सोमवारी पदाधिकार्‍याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ रिपाइंने तिसरा मोर्चा काढला.


  •