Tue, Mar 19, 2019 21:00होमपेज › Solapur › हत्तुरे वस्ती दुहेरी खूनप्रकरणी शिक्षक पतीसह पाच जण दोषी

हत्तुरे वस्ती दुहेरी खूनप्रकरणी शिक्षक पतीसह पाच जण दोषी

Published On: Mar 07 2018 11:19PM | Last Updated: Mar 07 2018 11:10PMसोलापूर : प्रतिनिधी

हत्तुरे वस्ती येथील पत्नी आणि सासू यांचा दुहेरी खून प्रकरणात शिक्षकासह पाच आरोपींना अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश श्रीमती आर. व्ही. सावंत-वाघोले यांनी दोषी धरले. दरम्यान, शिक्षकास फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी गुरुवारी न्यायालयात युक्‍तिवाद होणार आहे. 

सिद्धलिंग पंडित कामोणे (वय 31), पंडित शिवलिंग कामोणे (65), मंगल पंडित कामोणे (55), कैलाश पंडित कामोणे (40, सर्व रा. मल्लिकार्जुननगर, अक्‍कलकोट रोड, सोलापूर), श्रीशैल मडिळप्पा बिराजदार (47, रा. माँसाहेब विडी घरकुल, कुंभारी) अशी दोषी धरण्यात आलेल्यांची नावे आहेत. श्रीदेवी विठ्ठल शेवगार व संगीता सिद्धलिंग कामोणे या माय-लेकींचा खून करण्यात आला, तर श्रुती व सारिका शेवगार यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला होता. याबाबत श्रुती शेवगार हिने विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. 

संगीता हिचा सिद्धलिंग पंडित कामोणे याच्याशी मे 2015 मध्ये विवाह झाला होता. लग्‍नानंतर काही दिवसांनंतर सिद्धलिंग यास कायम शिक्षकाची नोकरी मिळण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्याच्या घरातील लोकांनी संगीताचा छळ करून तिने तिच्या माहेरून 20 लाख रुपये आणावेत म्हणून मागणी केली. त्यामुळे संगीताचा छळ होऊ लागला होता. या छळास कंटाळून संगीता ही तिची आई श्रीदेवी शेवगार हिच्या घरी गेली होती. 

28 जुलै 2015 रोजी रात्री सिद्धलिंग हा शेवगार यांच्या घरी गेला व त्याने संगीताला घटस्फोट पेपरवर सही का करत नाही, म्हणून वाद घातला. यावेळी संगीताला लाकडी मुसळाने मारहाण करीत असताना संगीताची आई श्रीदेवी शेवगार या सोडविण्यास आल्या. त्यावेळी त्यांनाही सिद्धलिंग याने मुसळाने मारून जखमी केले. दोघींच्या डोक्यात मोठा दगड घालून खून केला. तसेच यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या श्रुती व सारिका शेवगार यांनादेखील मुसळाने मारून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले. 

याची सुनावणी अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश सावंत-वाघोले यांच्यासमोर झाली. सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी सिद्धलिंग व श्रीशैल बिराजदार यांना खून केल्याप्रकरणी तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि पंडित कामोणे, मंगल कामोणे यांना छळ केल्याप्रकरणी दोषी धरले. याप्रकरणी सरकारच्यावतीने अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी, तर आरोपींच्यावतीने अ‍ॅड. व्ही. डी. फताटे, अ‍ॅड. मिलिंद थोबडे हे काम पहात आहेत.