होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांची अवस्था सर्कशीतील प्राण्यांसारखी 

मुख्यमंत्र्यांची अवस्था सर्कशीतील प्राण्यांसारखी 

Published On: Apr 07 2018 11:06PM | Last Updated: Apr 07 2018 9:13PMसोलापूर : प्रतिनिधी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सर्कशीतील प्राण्यांप्रमाणे झाली असून रिंगमास्टर सांगेल त्या पध्दतीने वर्तन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आगामी काळात सत्ता परिवर्तनाची चाहूल त्यांना लागली असल्याने त्यांचे वागणे, बोलणे बदलले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोलापुरात केला.

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नॉर्थकोट शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हल्लाबोल सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. जयदेव गायकवाड, चित्रा वाघ, कार्याध्यक्ष संतोष पवार, भारत जाधव, दीपक साळुंखे-पाटील आदी उपस्थित होते. 

यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजपवर चौफेर टीका करत असताना मुख्यमंत्र्यांवर चांगलाच निशाणा साधला. शरद पवार यांच्याविरोधात बोलण्याची लायकी नसणार्‍यांनी आपल्या दिल्लीतील राजकीय गुरुला विचारुन पवार यांच्याविषयी शब्दप्रयोग करावा, असा सल्ला मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ज्यांनी शरद पवारांचे बोट धरुन राजकारण शिकले, त्यांचे चेले तुम्ही आहात. त्यामुळे आपल्या ऐपतीप्रमाणे राहा, असा इशारा मुंडे यांनी दिला.चहावाल्यांचे नाव घेऊन राजकारण करणार्‍या भाजपवाल्यांनो चहातही भ्रष्टाचार करुन चहावाल्यांनाही बदनाम केले. त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादीचा नाद करु नका, असा दमही त्यांनी भाजप नेत्यांना भरला. भाजपातील 16 मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांचे पुरावेही बाहेर आले असताना मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. त्यामुळे भाजपने पारदर्शकतेचा डांगोरा यापुढे पिटू नये, असा निर्वाणीचा सल्ला मुंडे यांनी दिला. सोलापूरला दोन मंत्री आणि महानगरपालिकेची सत्ता दिली असताना याठिकाणी निष्क्रिय असणारे मंत्री श्रेयवादासाठी भांडत आहेत. मुख्यमंत्री याठिकाणची महापालिकाच बरखास्त करु, असा दम देत आहेत. यासाठी सोलापूरकरांनी मंत्री निवडून दिले आहेत का, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. सोलापूरची सत्ता कुरतडून खाण्यासाठी सोलापूरचे दोन्ही देशमुख मंत्री टपले असून त्यांना आधी मंत्रिमंडळातून हाकला, असा सल्लाही मुंडे यांनी यावेळी लगावला. आ. जयदेव गायकवाड, चित्रा वाघ, सुनील तटकरे, प्रदीप गारटडकर, भारत जाधव, संतोष पवार यांनी आपले विचार मांडले.