Mon, Nov 19, 2018 10:28होमपेज › Solapur › सरकारकडून गोपीनाथ मुंडेंचीही फसवणूक : धनंजय मुंडे

सरकारकडून गोपीनाथ मुंडेंचीही फसवणूक : धनंजय मुंडे

Published On: Apr 05 2018 6:33PM | Last Updated: Apr 05 2018 6:23PMसांगली/कुंडल : प्रतिनिधी

राज्य सरकारने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, महिला, युवक, व्यापारी, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाची तर फसवणूक केलीच आहे. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ज्यांच्या कष्टामुळे पक्षाला चांगले दिवस आले त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि लाखो ऊसतोड मजुरांचीही फसवणूक केली, अशी खंत विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू असलेली हल्लाबोल यात्रा आज सांगली जिल्ह्यात आली असता कुंडल येथील क्रांतिवीर जे. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना परिसरात ऊस तोडणीसाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील हजारो ऊसतोडणी कामगारांनी काम बंद ठेवत मुंडे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने कारखाना परिसरात  झालेल्या कार्यक्रमात मुंडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

मुंडे म्हणाले, 'जो समाज, ऊसतोड मजूर  स्वर्गीय मुंडे साहेबांच्या प्रेमाखातर भाजपाच्या पाठिशी राहिला त्या मुंडे साहेबांच्या नावे या सरकारने ऊसतोड कामगार महामंडळ जाहीर केले मात्र सुरू केले नाही. त्याचे कार्यालय सुरू केले नाही एकाही मजुराला त्याचा लाभ नाही. हा मुंडे साहेब आणि तुमचा अपमान आहे.' महामंडळ राहू द्या जाहीर केलेले स्मारक तरी केले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

अलिकडच्या काळात धनंजय मुंडे आपल्या कामाने राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुख मैदानी तोफ झाली असल्याचे गौरोद्‌गार यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

तासगाव येथील हल्लाबोल यात्रेच्या सभेत धनंजय मुंडे यांचे आगमन होताच युवकांनी व उपस्थितांनी वाघ आला रे वाघ आला, राष्ट्रवादीचा वाघ आला, अशा घोषणा दिल्या. त्यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांचे भाषण सुरू होते. त्यांनी याचा संदर्भ घेत हो वाघ ऊस्मानाबाद आणि जळगावच्या सभा करून आला असल्याचे सांगितले. त्यालाही उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात प्रचंड प्रतिसाद दिला.

Tags : hallabol andolan, in kundal, sangli, NCP, Dhananjay Mund, Ajit Pawar, Gopinath Munde