Thu, Apr 25, 2019 05:55होमपेज › Solapur › दीड तासात 3 लाख केले गोळा

दीड तासात 3 लाख केले गोळा

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:29PMबार्शी  : तालुका प्रतिनिधी

समाजात जाती-जातीमध्ये दरी वाढत असताना व प्रत्येकजण दुसर्‍याकडे तिरकस नजरेने बघत असताना मळेगाव (ता. बार्शी) येथील ग्रामस्थांनी मात्र  समाजातील अशा घटकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले आहे. मळेगावकरांनी आपल्या एकीचा प्रत्यय दाखवत गावातील ज्या अल्पसंख्याक समाजातील तरुणावर नियतीने आघात केला त्याला  स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कंबर कसली आहे.  शिवाजी तरुण क्रीडा व बहुद्देशीय मंडळाच्यावतीने ग्रामस्थांना करण्यात आलेल्या  आवाहनानुसार अवघ्या दीड तासात तब्बल तीन लाख रुपये आर्थिक मदत व तीही रोख स्वरूपात गोळा करण्याचे काम करण्यात आले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, 13 जानेवारी रोजी गावातील रितेश कांबळे या मुलाचा अपघात झाला होता. दोन्ही पाय फॅक्चर झाले होते.  सध्या तो मुलगा सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून  डॉक्टरांनी नातेवाईक सुरेश कांबळे यांना उपचारासाठी दहा लाख  रुपये खर्च अपेक्षित असून पैशाची जुळवाजुळव करा, असे सांगितले. 

कांबळे कुटुंबीयांचे दुखः हे आपलेच दुःख मानून त्या गरीब कुटुबांच्या पाठीशी सर्व मळेगावकर ग्रामस्थांनी उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला. आपण ज्या गावात,  समाजात जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन मळेगाव ग्रामस्थांनी व शिवाजी तरुण क्रीडा व बहुद्देशीय मंडळाच्यावतीने जनतेशी विचारविनिमय करून त्या मुलाला आधार देण्याचा निर्णय घेतला.
 मुलाच्या  उपचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या दानशूर मळेगावच्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत संकलित करण्यास हातभार लावल्याबद्दल त्या सर्व दात्यांचे बाळसाहेब माळी यांनी आभार मानले तसेच संपूर्ण  ग्रामस्थांनी तो जखमी मुलगा लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी ग्रामदैवताला साकडे घातले. यावेळी मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी, अध्यक्ष अंकुश माळी, सरपंच गुणवंत मुंढे, संतोष निंबाळकर, बंप्पा गडसिंग, अभिमान गडसिंग, निजाम शेख, अविनाश इंगोले, धीरज वाघ, अशोक माळी, उत्रेश्‍वर वाघ, कल्याण माळी, दशरथ इंगोले, काका गाभणे, बाबुराव बाबर, नितीन वाघमारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.