Thu, Apr 25, 2019 03:32होमपेज › Solapur › बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री सरसावले!

बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री सरसावले!

Published On: Jun 07 2018 11:02PM | Last Updated: Jun 07 2018 10:41PMसोलापूर : प्रशांत माने

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलेलो असून लवकरच पॅनल तयार करुन यंदा बाजार समिती भाजपच्या ताब्यात घेणार आणि शेतकर्‍यांना न्याय मिळवून देणार, असा निर्धार जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्‍त केला. यावेळी बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदारसंघातील सर्व शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार प्राप्त असल्याने निवडणुकीला महत्त्व प्राप्‍त झाले आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुखांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्री देशमुख यांची बुधवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्यानंतर बाजार समितीच्या विषयावर चर्चा करताना ते बोलत होते. बाजार समिती निवडणुकीसाठी पॅनल तयार करण्यासंदर्भात आज बैठक होती. परंतु राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याबरोबर पंढरपूर दौर्‍यावर असल्यामुळे बैठक होऊ शकली नाही, असेही मत त्यांनी व्यक्‍त केले. बाजार समितीच्या स्थापनेपासून बाजार समितीची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात आहे.

 यावेळी केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख सोलापूरचेच आहेत. सहकार व पणन खात्याने यंदापासून बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदारसंघातील सर्वच शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक व्होट बँकेला आता शह देता येईल, अशी स्थिती आहे.

दरम्यान, बाजार समितीवरील प्रशासकाने नुकतेच बाजार समितीच्या तत्कालीन 32 संचालकांवर बाजार समितीमध्ये गैरव्यवहार व अनियमितता केल्याचा ठपका ठेवत 39 कोटींच्या अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भाजपविरोधी काँग्रेस गटाला मोठा हादरा बसलेला आहे. 

निवडणुकीतील अर्ज छाननी प्रक्रियेत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचे उमेदवारी अर्ज बाद झाले होते. परंतु न्यायालयाकडून काहींना दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक तितकीशी सोपी नसणार आहे. कुंभारी गटातून पालकमंत्री देशमुखांनी बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. या निवडणुकीत पॅनल उतरवून बाजार समिती ताब्यात घेण्याची तयारी पालकमंत्र्यांनी सुरु केली आहे. बुधवारी सायंकाळी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर बाजार समिती निवडणूक मतदार याद्यांचे काम सुरु होते. त्यामुळे भाजपचे दोन्ही देशमुख गट ही निवडणूक एकत्र लढविणार की स्वतंत्र, अशी चर्चा सुरु झाली आहे.

पालकमंत्र्यांना समाजाचा सॉफ्ट कॉर्नर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा इतिहास पाहिला तर मागे वर्षानुवर्षे बाजार समितीची सत्ता लिंगायत समाजाच्या अधिपत्याखाली राहिलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या ताब्यात ही सत्ता आली आहे. बाजार समितीवर प्रशासक नियुक्‍तीच्या सहकार व पणन खात्याच्या झटक्यामुळे विद्यमान सत्ताधार्‍यांना बाजूला व्हावे लागले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुखही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सरसावले आहेत. सहकारमंत्री देशमुखांच्या ताब्यात बाजार समितीची सत्ता गेल्यास पुन्हा मराठा समाजाचे बाजार समितीवर प्राबल्य राहणार आहे. त्यामुळे लिंगायत समाजाचे नेतृत्व करणारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यामागे यावेळी लिंगायत समाजाची ताकद लागण्याची शक्यता आहे. पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वच पक्षातील लिंगायत समाजाचे नेते पालकमंत्र्यांना बाजार समिती निवडणुकीत छुपी मदत करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्‍त करीत आहेत. या निवडणुकीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याने त्यानंतरच पालकमंत्र्यांचे वक्‍तव्य खरे ठरणार का, हे स्पष्ट होणार आहे.