Mon, Apr 22, 2019 01:43होमपेज › Solapur › तंत्रनिकेतनसाठी सावित्रीच्या लेकींची गांधीगिरी

तंत्रनिकेतनसाठी सावित्रीच्या लेकींची गांधीगिरी

Published On: Feb 21 2018 1:19AM | Last Updated: Feb 21 2018 1:19AMलातूर : प्रतिनिधी

लातुरातील महिला निवासी तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी तेथील विद्यार्थिनींनी महापुरुषांच्या तसबिरीसमोर दोन तास उन्हात बसून अभ्यास करून लक्ष वेधले. शासन न्याय देत नाही आपण आम्हाला न्याय द्या, अशी विनंती त्यांनी महापुरुषांना केली.

लातूर येथे मराठवाड्यातील एकमेव महिला निवासी तंत्रनिकेतन आहे. 1994 मध्ये सुरू झालेल्या या तंत्रनिकेतनमध्ये अनेक मुलींनी शिक्षण घेतले आहे. सध्या 900 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. अत्यल्प शुल्कांत येथे शिक्षण मिळत असल्याने त्याचा आधार मुली व पालकांना वाटतो. तथापि 10 ऑक्टोबर 2016 रोजी शासनाने हे तंत्रनिकेतन बंद करण्याचा आदेश काढला होता. को एज्युकेशनच्या नावावर लातूर येथे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु केले जाणार असल्याने तंत्रनिकेतन बंद करण्यात येत असल्याचे शासनाने कळवले होते. त्यामुळे तेथे शिक्षण घेत असलेल्या मुली धास्तावल्या होत्या. 

तंत्रनिकेतन बंद न करता शासनाने अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. ती विचारात घेतली गेली नसल्याने प्रा. सुधीर साळुंके यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शासनाच्या आदेशास स्थगिती मिळवली होती. 10 जानेवारी रोजी  तंत्रनिकेतन बंद करण्याचा आदेश शासनाने पुन्हा काढल्याने मुलींनी गांधीगिरी केली.

खेड्यातील गरीब कुटुंबातील हुशार विद्यार्थींनी मुलींना शिक्षण देणारे मराठवाड्यातील एकमेव मुलींचे निवासी तंत्रनिकेतन आहे. शासन एकीकडे मुलींना शिकवण्याचा आग्रह करत आहे. तर दुसरीकडे मुलींचे तंत्रनिकेतन बंद करीत आहे, हा अन्याय असून त्याविरोधात यापुढेही आंदोलन करण्यात येईल, असे प्रा. साळुंके यांनी सांगितले.