होमपेज › Solapur › सरकारचा ऑनलाईनचा अट्टाहास शेतकर्‍यांच्या मुळावर : पाटील

सरकारचा ऑनलाईनचा अट्टाहास शेतकर्‍यांच्या मुळावर : पाटील

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:46PM

बुकमार्क करा

माढा : वार्ताहर

सरकारचा ऑनलाईनचा अट्टाहास शेतकर्‍यांच्या मुळावर आला आहे. ऑनलाईन व अपडेट सरकारच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांच्या घरावर नांगर फिरत असल्याची घणाघाती टीका शेतकरी कामगार पक्षाचे नेते अ‍ॅड. भाई बाळासाहेब पाटील यांनी केली. ते केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माढा तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात बोलत होते.

यावेळी बाळासाहेब पवार, सतीश सुर्वे, सुधीर पाटील, पोपट चोपडे, सुरेश चोपडे, सोपान पवार, अजित पाटील, महादेव जगताप, सज्जन पाटील, प्रवीण पाटील, दिलीप महालिंगडे, जोतीराम मोटे, वैजिनाथ भोगे आदी प्रमुख उपस्थित होते.

भाई बाळासाहेब पाटील म्हणाले, ऑनलाईन पध्दतीमुळे प्रत्येक गोष्टीत वेळ लागतो. उडीद खरेदी केंद्रावर साडेचार हजार शेतकर्‍यांनी नोंद केली आहे. परंतु दिवसाला फक्त वीस ते पंचवीस शेतकर्‍यांचा उडीद खरेदी केला जातो. यातील ऑनलाईन प्रक्रियेमुळे हा उशीर लागतो आहे. सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थितीनंतर यावर्षी चांगला पाऊस झाला. खरीप पिके चांगली आहेत. त्यांच्या खरेदी केंद्रावर गोंधळाची स्थिती असताना सरकारने शेतीपंपाची वीज तोडण्यास सुरुवात केली आहे. मुळातच चुकीच्या पध्दतीने वीजबिल आकारणी करण्यात आली आहे. तीन वर्षे शेतीपंपाची वीज वापरलीच नाही तर बिल कसले, असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी सरकारी संगणकावरून झालेली वीजबिलाची आकारणी पाहता हे संगणक जादूची मशीन असल्याची उपरोधिक टीका केली. रोपळे फिडरवरील सात गावांची वीज बंद असल्याचा, तर भेंड सबस्टेशनवरुन एका थकबाकीदारासाठी गावाला वेठीस धरण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी निवासी नायब तहसीलदार सचिन मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.