Wed, Apr 24, 2019 00:26होमपेज › Solapur › शासकीय रुग्णालयातील दर वाढल्याने निदर्शने

शासकीय रुग्णालयातील दर वाढल्याने निदर्शने

Published On: Jan 03 2018 1:18AM | Last Updated: Jan 02 2018 11:04PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी 

सर्वसामान्य लोकांचे उपचार होत असलेल्या शासकीय रुग्णालयातील उपचारांचे, तसेच विविध शस्त्रक्रियांचे दर शासनाने वाढविले आहेत. त्याच्या निषेर्धात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री निवेदन स्वीकारत नसल्याचे कारण पुढे करत कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गाडीवर घोषणा फलक फेकले, तर काही कार्यकर्ते गाडीच्या आडवे पडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

राज्य शासनाने डॉक्टरांसंदर्भात नवीन कायदा आणला असून, दुसरीकडे उपचारांचे दरही वाढविले आहेत. त्यामुळे सर्वसमान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने वाढविलेले दर तत्काळ कमी करावेत, या मागणीसाठी काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.      

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विद्यमान सरकारचा निषेध नोंदविला तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याविरोधातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ना. देशमुख हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असल्याने काँगे्रस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केली. पालकमंत्री बैठकीसाठी दाखल होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्‍काबुक्‍कीचा प्रकारही घडला. संतत्प कार्यकर्त्यांनी घोषणांचे फलक पालकमंत्र्यांच्या गाडीवर भिरकावले. यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, अंबादास करंगुळे, गणेश डोंगरे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.