Mon, Jan 21, 2019 22:05होमपेज › Solapur › अबब..कोट्यवधींचा महसूल बुडतोय!

अबब..कोट्यवधींचा महसूल बुडतोय!

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 12:16AMसोलापूर : प्रतिनिधी 

नियम व अटींची पूर्तता न होऊ न शकल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी वाळू ठेक्याचे लिलावच झाले नाहीत. त्यामुळे शासनाचा जवळपास 145 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. चालूवर्षीही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे चालूवर्षीही वाळूचे लिलाव होतील की नाही याविषयी अनिश्‍चितता  निर्माण झाली आहे.त्यामुळे वाळूचोरीला प्रोत्साहन देण्याचा प्रकारच प्रशासनाच्या वतीने सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 138 ठिकाणांहून लिलाव करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे आले आहेत. यामध्ये पर्यावरण विभाग, गौण खनिज विभाग आणि भूजल सर्वेक्षण विभागाने एकत्रित अहवाल देणे अपेक्षित आहे.  कोणत्याच विभागाने अद्याप अहवाल सादर केलेला नाही. तर दुसरीकडे पाच हेक्टरपेक्षा अधिकचे क्षेत्र असणार्‍या वाळू ठेक्याच्या लिलावास परवानगी देण्याचा अधिकार राज्यस्तरीय कमिटीला आहे, तर 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणार्‍या वाळू ठेक्याचा लिलाव करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीला आहेत. त्यामुळे किमान छोट्या-छोट्या ठिकाणचा तरी वाळू लिलाव काढावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वाळूचोरीला प्रोत्साहन देण्याचा प्रकारच प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. तर दुसरीकडे वाळूची मागणी प्रचंड असल्याने चढ्या दराने वाळू खरेदी करणार्‍यांची संख्या वाढली आहे. मात्र यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसूलला चुना लागत आहे. ही गोष्ट कोणीच गांभीर्याने घेताना दिसत नाही. तर सध्या जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, इंदिरा आवास योजना अशा सर्वसामान्य लोकांच्या घरकुलासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेसाठीही आता मोठ्या प्रमाणावर वाळू आवश्यक आहे. मात्र जिल्ह्यात वाळूचा लिलावच होत नसल्याने या गोरगरीब लोकांनाही आता अधिक पैसे देऊन चोरीने वाळू विकत घ्यावी लागत आहे. त्यामुर्ळं वाळू चोरीला प्रोच्छाहन मिळत आहे.