Tue, May 21, 2019 18:33होमपेज › Solapur › अन्न व औषध प्रशासनाच्या कामगिरीने आषाढी वारी निर्विघ्न !

अन्न व औषध प्रशासनाच्या कामगिरीने आषाढी वारी निर्विघ्न !

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:24PMसोलापूर : रामकृष्ण लांबतुरे

अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ख्याती असलेल्या श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीत लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. याच गर्दीचा  फायदा घेऊन आपले उखळ पांढरे करण्यासाठी अनेक हौसेनवसे निष्कृष्ट दर्जाचे पदार्थ माथी मारतात. मात्र अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे होणारा मोठा अनर्थ टळला आहे. 

बाबा महाराज सातारकर यांच्या मठात अनेक वारकरी दाखल होत असतात. त्याठिकाणी अनेक भक्तिमय कार्यक्रम होत असतात. याच मठात अन्नदान वाटप म्हणून खराब झालेली, शरीराला अपायकारक असणारी शिळी भाजी वाटण्यात येत होती. मात्र अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी त्याठिकाणी जाऊन नमुने घेतले. खराब झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भाजीवाटप करु नये, असे आवाहन केले. मात्र मठातील लोक आम्ही वाटणारच, तो प्रसाद असल्याचा दावा करु लागले. यावर आपणच पहिल्यांदा खाऊन पाहावे, असे म्हटल्यानंतर त्या  भक्तांनी शिळी भाजीचे वाटप केले नाही. अन्न सुरक्षा अधिकार्‍याने भाजी ताब्यात घेऊन नष्ट केली. त्याचे वाटप झाले असते तर अनेक भाविकांना विषबाधा झाली असती. 

याच आषाढी वारीत 17  ते 24 जुलैच्या कालावधीत आषाढी वारी मोहीम घेऊन 1 हजार 541 किलोचा कर्नाटकातून आलेला भेसळयुक्त मावा पेढा जागीच नष्ट केला. हा पेढा 1 लाख 79 हजार रुपये किंमतीचा होता. गुजरात राज्यातून आणलेली 8 हजार 630 रुपये किंमतीची 62 किलो गुजरात स्पेशल बर्फी खाण्यायोग्य नसल्याने नष्ट केली. चार हजार किंमतीचे 200 लिटर दूधही नष्ट केले. खराब पाण्याने  बनवण्यात आलेला 25 किलोचे अखाद्य पदार्थही अन्न औषध प्रशासनाच्या सुरक्षारक्षकांनी शोधून नष्ट केले.

पुणे विभागाचे 20 सुरक्षा अधिकारी, जिल्ह्यातील 8 सुरक्षा अधिकारी, अशा 28 सुरक्षा अधिकार्‍यांची पालखी वारीच्या प्रत्येक मार्गावर नेमणूक केली होती. आपत्कालीन सेंटर नेमून भेसळ नमुने सेंटरवर तपासून रिपोर्टिंग करण्याचे आदेश दिले होते. आषाढी वारी मोहिमेत 1 हजार 200  तपासण्या आणि विक्रेत्यांना प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण दिले गेले. अन्न औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे, योगेश देशमुख, उमेश भोसे, व्ही.आर. शेटे, आर. एन. बडे या पाचजणांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार, सन्मान होणार असल्याचे राऊत यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले. 

गुटखाबंदी कारवाईत सोलापूर राज्यात अव्वल 
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत विविध 23 ठिकाणी धाडी टाकून सुमारे 24 लाख 55 हजार 972   रुपयांचा विविध प्रकारचा गुटखा जप्त केला आहे. यात सहा वाहनेही जप्त केली आहेत. गुटखाबंदीवरील कारवाईत सोलापूर जिल्हा राज्यात एक नंबरवर आहे. राज्यात गेल्या चार वर्षांपासून गुटखाबंदी आहे. तरीही शेजारील कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात काळ्या बाजाराने गुटखा येतो.