Sun, Aug 25, 2019 19:40होमपेज › Solapur › सोलापूरकरांसाठी ‘फील गुड’ अंदाजपत्रक!

सोलापूरकरांसाठी ‘फील गुड’ अंदाजपत्रक!

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 12 2018 9:41PMसोलापूर : प्रतिनिधी

कोणत्याही प्रकारचे कर व दरवाढीची शिफारस नसलेले 1357 कोटी 49 लाख 67 हजार 401 रुपयांचे अंदाजपत्रक सभागृह नेते संजय कोळी यांनी मंगळवारी सभागृहात सादर केले. स्थायी समिती सभापती निवड न्यायप्रविष्ट असल्याने कोळी यांनी अंदाजपत्रक सादर केले. गतवर्षी 1239 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात यंदा सुमारे 118 कोटींची वाढ सूचविण्यात आली आहे. आयुक्‍तांनी सूचविलेल्या उत्पन्‍नामध्ये दुरुस्त्या करून सत्ताधार्‍यांनी त्यात 90 कोटी रुपयांची वाढ केली असून, सक्‍तीच्या 18.70 कोटींचा खर्च वगळता उर्वरित 71 कोटी 30 लाखांच्या निधीतून विविध विकासकामे सूचविली आहेत.

मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास महापालिकेच्या काऊन्सिल हॉलमध्ये सभागृह नेते संजय कोळी यांनी आर्थिक अंदाजपत्रकाचे वाचन केले. सोलापूरकरांना विशेष दिलासा देणारी बाब म्हणजे या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाही. तसेच, महसुली विभागातून 588 कोटी 91 लाख 79 हजार, पाणीपुरवठ्यापासून 88 कोटी 71 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महसूल निधीतून भांडवली कामासाठी 211 कोटी 14 लाख 31 हजार रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. अनुदानातून 434 कोटी 70 लाख, कर्ज विभागातून 10 कोटी, विशेष अनुदान सहा कोटी, शासकीय सहाय्य 18 कोटी रुपये आणि इतर असे एकूण 1357 कोटी 49 लाख 67 हजार 401 रुपये या अंदाजपत्रकात अपेक्षित धरण्यात आले आहेत.

अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार खर्च विभागात कर्मचार्‍यांच्या पगारावर 169 कोटी 49 लाख 9 हजार रुपये, कर्जावरील खर्च 3 कोटी 32 लाख 96 हजार, प्राथमिक शिक्षण 16 कोटी 13 लाख 85 हजार, पाणीपुरवठा 88 कोटी 71 लाख, सेवानिवृत्ती वेतन व तोषदान 55 कोटी 46 लाख, आरोग्य 18 कोटी 46 लाख, निगा व दुरुस्ती 33 कोटी 80 लाख, दिवाबत्ती व अग्निशमन 14 कोटी 38 लाख, विकास शुल्क 25 कोटी, गुंठेवारी क्षेत्रात मुलभूत सुविधा 10 कोटी, आवश्यक बाबींवर नैमित्तीक खर्च 74 कोटी 70 लाख, संकीर्ण 1 कोटी 80 लाख, महसूल निधीतून भांडवली कामासाठी वर्ग 155 कोटी 34 लाख 3 हजार आणि परिवहन उपक्रमाला सहाय्य 11 कोटी इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

महत्त्वाच्या शिफारसी
- शहरात दिवसाआड, हद्दवाढ भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा.
- आरक्षणांचा विकास करण्यासाठी नियोजन करावे.
- नवीन उद्योगांना करामध्ये पाच वर्षांसाठी प्रती वर्ष 20 टक्के सवलत द्यावी.
- झोपडपट्टीतील पक्क्या घरांसाठी कर आकारण्यासाठी समिती
- हद्दवाढ भागात भाजीमंडई सुरु करावी.
- जुळे सोलापुरात नाट्यगृह उभारावे.
- सार्वजनिक नळ बंद करून, प्रत्येक झोपडीधारकास मोफत नळजोड द्यावा.
- शहरातील उद्यानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु कराव्यात.
- महावितरणला एलबीटी लागू करावी.

एलबीटीतून 35 कोटी मिळणार
महापालिकेच्या यंदा एलबीटीमधून 35 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा गृहित धरण्यात आली असून, पाणीपुरवठ्यातून 88 कोटी 71 लाख, कराच्या रुपातून 120 कोटी, जागेच्या भाड्यापोटी 36 कोटी, तर शासकीय अनुदानापोटी 234 कोटी 55 लाख 61 हजार रुपये जमा होणार आहेत.