Sun, Aug 25, 2019 19:27होमपेज › Solapur › आक्रमकतेला विधायक वळण द्या : विश्‍वास नांगरे-पाटील

आक्रमकतेला विधायक वळण द्या : विश्‍वास नांगरे-पाटील

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 17 2018 8:38PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

ज्या वयात आपल्यावर विचारांचा जास्त प्रभाव पडत असतो. त्या वयात आपण नेमके काय करायचे आणि काय नको हे समजत नाही. आपल्या आक्रमकतेला विधायक व रचनात्मक वळण दिल्यास त्याचा परिणाम होऊन आपले भविष्य उज्वल होईल. देहात शक्‍ती, मनात उत्साह, मनगटात बळ, सिंहासारखे बळ, आई वडिलांवर श्रद्धा असते तोच खरा युवक आहे. आणि आजच्या युवकांनी सोशल मीडियात वेळ वाया घालवू नये, कोणत्या वेळेस  आयुष्यात मोठे व्हायचे तर कोणत्या वेळेस  लहान व्हायचे समजले की माणसाला आयुष्याचा खरा अर्थ समजतो. असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षकस्तरीय युथ पार्लमेंट चँपियनशिप -2018 च्या वक्‍तृत्व स्पर्धा व पारितोषक वितरणासाठी आज ते स्वेरीत आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून हास्यसम्राट दीपक देशपांडे होते. युथ पार्लमेंट चँपियनशिप -2018 च्या स्पर्धेचे उद्घाटन पोलिस अधीक्षक (ग्रामीण) वीरेश प्रभू यांनी केले. अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी प्रस्तावनेत स्पर्धेच्या आयोजनाचा हेतू सांगितला तर स्पर्धेचे नियम भाग्यश्री कलघटगी यांनी सांगितले. तर दुसरीकडे इनडोअर स्पोर्ट कॉम्पलेक्स उद्घाटन महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

वक्‍तृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन गटात अनुक्रमे प्रथम क्रमांक शिवाजी महाविद्यालय बार्शी, द्वितीय-आर्किड अभियांत्रिकी, तृतीय-अकलूज महाविद्यालय तर माध्यमिक गटात प्रथम सुलाखे विद्यालय बार्शी, द्वितीय द.ह. कवठेकर पंढरपूर तर तृतीय नूतन हायस्कूल कुर्डुवाडी यांनी पारितोषक पटकाविली. दोन्ही गटांत प्रत्येकी 7 संघांचा समावेश होता.

परीक्षक म्हणून दत्ता थोरे, श्रीकांत साबळे, बी.जी.कुलकर्णी यांनी काम पहिले.  वक्‍तृत्व स्पर्धेत छेडछाड पासून तेलगी घोटाळ्यापर्यंतचे विविध विषयावर स्पर्धकांनी आपली मते मांडली. विजेत्यांना स्मृती चिन्ह व प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर हास्यसम्राट देशपांडे यांनी विविध आवाजात मिमिक्री सादर करून उपस्थितांना पोट धरून हसण्यास भाग पाडले.  यावेळी सहायक पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्ह्यातील पोलिस उपअधीक्षक, पोलिस अधिकारी व राहुल जोशी,  प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे,  धनंजय सालविठ्ठल, प्रा. करण पाटील, प्राध्यपकवर्ग व 3000 विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर अपर पोलीस अधीक्षक मोहिते यांनी आभार मानले.