Tue, Apr 23, 2019 10:15होमपेज › Solapur › शंभर दिवसांत धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

शंभर दिवसांत धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 10:08PMसोलापूर : प्रतिनिधी  

विद्यमान शासनाने धनगर समाजाला येत्या शंभर दिवसांत एसटीचे जात प्रमाणपत्र द्यावे अन्यथा महाराष्ट्रभर  वेगवेगळ्या पध्दतीने हिंसक आंदोलने हाती घेऊ, असा इशारा धनगर समाजबांधवांच्यावतीने देण्यात आला आहे.

भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर  यांच्या उपस्थितीत बुधवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळसाहेब शेळके, अर्जुन सलगर, मनिषा माने, मच्छिंद्र ठवरे, पवन पाटील, अमोल कारंडे, राम वाकसे, शेखर बंगाळे आदी उपस्थित होते. 

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला आरक्षणसंदर्भात वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने करण्यापूर्वी शासनाला येत्या शंभर दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येणार आहे. यामध्ये शासनाने महाराष्ट्र धनगड हेच धनगर आहेत हे सिध्द करुन महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली. 

यावेळी उपस्थित धनगर समाजबांधवांना मार्गदर्शन करताना माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांनी महाराष्ट्रात असणारा धनगर समाज हा शासनाच्या यादीत धनगड आहे. त्यामुळे धनगर समजाला तात्काळ एसटीचे आरक्षण लागू करावे. जर यासाठी आदिवासी समाजाचा विरोध आहे तर आदिवासी आणि धनगर समजामध्ये अबकड अशी वर्गवारी करावी. अन्यथा महाराष्ट्रात अस्तित्वात नसणारा धनगड समाज अस्तित्वात असल्याचे सिध्द करुन दाखवावे, असे आवाहन केले.

त्यामुळे महाराष्ट्रात धनगर हेच धनगड आहेत. त्यामुळे शासनाने टोलवाटोलवी न करता आता तात्काळ समाजाचा भावना लक्षात घेऊन येत्या शंभर दिवसांत राज्यातील धनगर समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र द्यावे, असे आवाहन केले. येत्या निवडणुकीपूर्वी राज्यातील नव्हे तर देशातील समाज या लढ्यात सहभागी होईल. यासंदर्भात पुणे येथे 1 ऑगस्टला समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासंदर्भातील नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कारंडे, शिवाजी वाघमोडे, सदाशिव सलगर, अमर दुधाळ, निलेश देवकते, जीवन जानकर, अण्णा कोळेकर, ज्ञानेश्‍वर डोंबाळे आदी उपस्थित होते.