Sun, Nov 18, 2018 05:36होमपेज › Solapur › ‘जीआयएस’ची आजपासून फेरपडताळणी

‘जीआयएस’ची आजपासून फेरपडताळणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील मिळकतींच्या जीआयएस सर्व्हेबाबत महापालिका व सायबरटेक कंपनी मंगळवारपासून संयुक्‍तपणे फेरपडताळणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. याकरिता 95 पथके गठित करण्यात आली आहेत. 

मनपाकडून शहरातील मिळकतींचे दर चार वर्षांनी रीव्हिजन होणे गरजेचे असताना गेल्या 12 वर्षांत हे काम झाले नाही. या कालावधीत तीन रीव्हिजनचे काम न झाल्याने मनपाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. 

मनपाकडे शहरात सुमारे एक लाख, तर हद्दवाढ भागात सव्वा लाख म्हणून एकूण सव्वा दोन लाख मिळकतींची नोंद आहे. मनपाच्या रेकॉर्डवर नसलेल्या हजारो मिळकती आहेत. रेकॉर्डवरील मिळकतींचे रिव्हिजन तसेच नव्या मिळकतींचा शोध घेण्याच्या उद्देशाने सन 2014 मध्ये सायबरटेक कंपनीला पाच कोटी 20 लाखांचा मक्‍ता देण्यात आला होता. हे काम एका वर्षात करण्याचा करार होता, मात्र हे काम संथगतीने होत असल्याने चार वर्षे होत आले असूनही हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. अशातच कंपनीच्या कामाविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या. यावरुन मनपा व कंपनीने एकमेकांकडे बोट दाखविले.

कंपनीने आतापर्यंत एक लाख 95 हजार 287 मिळकतींचा सर्व्हे केल्याचा दावा केला आहे. मिळकतींचे मोजमाप चुकीचे झाल्याच्या तक्रारी असल्याने आता मंगळवारपासून मनपा व कंपनीच्या संयुक्त विद्यमाने जीआयएस सर्व्हेची फेरपडताळणी तसेच मूल्यांकनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकरीता एकूण 95 पथके गठीत करण्यात आली असून प्रत्येक पथकात 3 कर्मचारी राहणार आहेत, अशी माहिती मनपाचे उपायुक्‍त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली.  
या फेरपडताळणीमुळे मिळकतींचे अचूक मोजमाप होणार असून तसेच नळ अधिकृत की बोगस आदींची माहिती अचूकपणे संकलित होणार आहे. काही दिवसांपूर्वी महापौरांनी जीआयएसचा मक्‍ता रद्द करण्याची मागणी केली होती, पण आयुक्तांनी ती नाकारली आहे. पडताळणी मोहिमेत 8(1) व 8 (2) असे दोन फॉर्म भरण्यात येणार आहेत.  8(1) हे फॉर्म मनपा कर्मचारी भरणार असून 8 (2) फॉर्म मिळकतदाराने भरुन द्यावयाचे आहेत. ही माहिती नंतर अपलोड करण्यात येणार आहे. 8 (2) फॉर्म मिळकतदाराने भरुन देणे गरजेचे आहे. हा फॉर्म भरुन न देणार्‍या मिळकतदारास नंतर मिळकतीच्या मोजमापाबाबत अपिलाची संधी मिळणार नाही. कर मूल्यांकनाचे कामही या मोहिमेद्वारे होणार आहे. 


  •