Fri, May 24, 2019 09:25होमपेज › Solapur › ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽ’च्या गजरात तुळजापुरात घटस्थापना

‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽ’च्या गजरात तुळजापुरात घटस्थापना

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:41PM

बुकमार्क करा

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजाभवानी देवीच्या प्रमुख उत्सवांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र महोत्सवास मंगळवार, 26 डिसेंबर रोजी दुपारी 12 वा. प्रारंभ झाला. यंदाच्या शाकंभरी उत्सवाचे मुख्य यजमान अजित परमेश्‍वर कदम यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात आणि विधिवत पारंपरिक प्रथेप्रमाणे सपत्नीक घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिर परिसर ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽ’च्या गजराने दुमदुमून गेला होता. 

तत्पूर्वी, सोमवारी आणि मंगळवारच्या पहाटे नवरात्रपूर्व श्री तुळजाभवानीमातेची नऊ दिवसांची मोहनिद्रा संपन्न होऊन चांदीच्या पलंगावरून जागृत मूर्ती सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापित करण्यात आली.

त्यानंतर देवीची नित्योपचार पूजा विधी झाल्या. देवीच्या पंचामृत अभिषेक पूजेनंतर घटकलशातून श्री गोमुख तीर्थाचे जलभरण करून मुख्य यजमान अजित परमेश्‍वर कदम यांच्या हस्ते मिरवणुकीने मंदिर गाभार्‍यात घटकलश आणण्यात आला. त्यानंतर यंदाच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या मुख्य यजमानांच्या हस्ते सपत्नीक पारंपरिक पद्धतीने विधीवत घटस्थापना करण्यात आली.

यावेळी संपूर्ण मंदिर परिसर ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽ’च्या गजरात दुमदुमून गेला. यावेळी मुख्य यजमान अजित परमेश्‍वर कदम यांच्यासह महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी शिवराज पाटील, अमर परमेश्‍वर कदम, शिवाजी परमेश्‍वर, प्रशांत सोंजी, अविनाश गंगणे, तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक (व्यवस्थापन) सुनील पवार, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, मंदिर कर्मचारी यांच्यासह भोपे, पुजारी, सेवेकरी, भाविक भक्तांची उपस्थिती होती.

मुख्य नवरात्र महोत्सवाप्रमाणे या शाकंभरी नवरात्र महोत्सवात सर्व विधी पार पडत असतात. या नवरात्रात देवीच्या विविध रुपातील विशेष अलंकार महापूजा मांडल्या जातात.

बुधवार, 27 डिसेंबर रोजी नित्योपचार पूजा व रात्री छबिना, गुरुवार, 28 रोजी रथअलंकार महापूजा व रात्री छबिना, शुक्रवार, 29 रोजी मुरली अलंकार महापूजा व रात्री छबिना, शनिवार, 30 रोजी सकाळी जलयात्रा उत्सव मिरवणूक, दुपारी शेषशायी अलंकार महापूजा व रात्री छबिना, रविवार, 31 डिसेंबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्री छबिना, सोमवार, 1 जानेवारी रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा व रात्री छबिना, मंगळवार, 2 जानेवारी रोजी कोहळ्याची पूर्णाहुती देऊन घटोत्थापन करून शाकंभरी नवरात्र उत्सवाची सांगता व रात्री छबिना याप्रमाणे कार्यक्रम पार पडणार आहेत. बुधवार, 3 रोजी दुपारी अन्नदान व महाप्रसाद होणार आहे. 

मुख्य नवरात्र काळाप्रमाणे सर्व विधी होत असल्याने नवरात्र काळात देवी दर्शनाची पर्वणी हुकलेल्या भाविकांना या शाकंभरी नवरात्रात देवी दर्शनाचा लाभ घेता येतो तसेच हजारो कुमारिका आणि सुवासिनींद्वारे पापनाश तीर्थातील इंद्रायणी कुंडातील जलभरण केलेल्या जलकलशांची पारंपरिक मिरवणूक म्हणजे जलयात्रा हे शाकंभरी नवरात्र उत्सवातील प्रमुख आकर्षण असते. शनिवार, 30 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता पापनाश तीर्थापासून जलयात्रा उत्सव प्रारंभ होणार आहे.