सोलापूर : प्रतिनिधी
महाशिवयोगी श्री सिद्धरामेश्वर व कुंभार कन्येच्या विवाह सोहळ्यातील धार्मिक विधीसाठी लागणार्या कुंभार समाजाकडून सवाद्य मिरवणुकीने मातीच्या 56 घागरी पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांना सुपूर्द करण्यात आल्या.
बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बाळी वेसमधील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील कुंभार वाड्यात कुंभार कन्येच्या घरी श्री गणेश व श्री शिवयोगी सिध्देश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वेदमूर्ती इरय्या मठपती स्वामी यांच्या पौरोहित्याखाली पंचामृत घागरीची पूजा करून दिवे बसविण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी कुंभार समाजातील मल्लिकार्जुन सिद्रामप्पा म्हेत्रे-कुंभार, नागनाथ मलकप्पा म्हेत्रे-कुंभार, रेवणसिद्ध मल्लिकार्जुन म्हेत्रे-कुंभार, संगण्णा कलण्णा म्हेत्रे-कुंभार, महादेव रेवणसिद्धे म्हेत्रे-कुंभार, सुरेश सिद्राम म्हेत्रे-कुंभार या सहा मानकर्यांच्या प्रमुख उपस्थितीत मातीच्या 56 घागरींची विधीवत पूजा करण्यात आली. कुंभार वाड्यापासून ते हिरेहब्बू यांच्या घरापर्यंत सवाद्य मिरवणुकीने 56 घागरी आणून मानकरी हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
मिरवणुकीत बँड पथक, सनईचा मधूर आवाज यासह ‘श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय’च्या जयघोषाने सारा बाळी वेस परिसर दुमदुमून गेला होता. या घागरी देण्याच्या विधीची सांगता मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यात करण्यात आली.
यावेळी सोलापूर जिल्हा कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार, उपाध्यक्ष सुरेश म्हेत्रे, मल्लिकार्जुन कुंभार, संघटक अनिल टाकळीकर, सल्लागार नागेश म्हेत्रे, कार्याध्यक्ष त्रिंबक कुंभार, वीरूपाक्ष कुंभार, भीमराय कुंभार, सातलिंगप्पा कुंभार, शिवपुत्र कुंभार, श्रीशैल कुंभार, संगप्पा कुंभार, महासिद्ध कुंभार, उमदी कुंभार, बलभीम म्हेत्रे यांच्यासह कुंभार-म्हेत्रे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.