होमपेज › Solapur › करकंबला २१ परप्रांतीय चोरांची टोळी जेरबंद

करकंबला २१ परप्रांतीय चोरांची टोळी जेरबंद

Published On: Jul 22 2018 11:59PM | Last Updated: Jul 22 2018 11:45PM



करकंब : भीमा व्यवहारे

पंढरपूरच्या आषाढी यात्रेदरम्यान पाकीट मारण्यासाठी आलेल्या परप्रांतीय 21 चोरट्यांची टोळी करकंब पोलिसांनी जेरबंद केली आहे. दोन चारचाकी वाहनांसह सर्व 21 जणांना ताब्यात घेतले आहे. 
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर (दि 19) रोजी पाकीट चोरी करताना एकास पकडण्यात आले होते. त्या टोळीतील इतर चोर  पंढरपूरला पाकीट चोरीसाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वारींनिमित्त करकंब परिसरात बंदोबस्तास असलेले सपोनि उमेश धुमाळ  यांना हरियाना पासिंगच्या गाडी चालकाकडे चौकशी करताना संशय आल्याने त्यांनी गाडीसह सर्वांना ताब्यात घेतले असता इतर दोन गाड्यातूनही  आलेले 21 पाकीट चोर सापडले आहेत.

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरच्या दिशेने सराईत पाकिट चोरी करणारी टोळी येत असल्याची माहिती मिळाल्यावरून करकंब पोलिस स्टेशनचे सपोनि उमेश धुमाळ यांनी टेंभुर्णी - पंढरपूर मार्गावर भोसेपाटी नजिक हरियाणामधील गाडीच्या चालकाकडे चौकशी केली असता त्याचे नाव व पोलिस अधीक्षक यांच्याकडील माहितीनुसार मिळालेल्या नावामध्ये साम्य आढळून आल्याने गाडी ( क्र.एच. आर. 51 बी. एस. 3525 ) या गाडीतील चार महिला व तीन पुरुष यांच्याकडे तुटलेल्या अवस्थेत सोन्याच्या साखळ्या, मोबाईल व रोख रक्‍कम व   पुढील काळात मोठी गर्दी होईल अशा मुख्य देवस्थानांचा नकाशा मिळाला आहे.

 तर करकंब येथील बासुरी हॉटेल  येथे आणखी दोन संशयित हरियाना येथील गाड्या ( क्र.एच. आर. 51 ए. व्ही.3691, एच. आर. 29 ए. के. 1591) थांबल्या असल्याची माहिती करकंब पोलिसांना मिळाली. 
या गाडी मधील सात महिला व सात पुरुष यांच्याकडे चौकशी केली असता पंढरपुरातील आषाढी वारीतील गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमारी करण्याच्या उद्देशाने निघाले असल्याचे समोर आले आहे. हे सर्व चोरटे  फरिदाबाद (हरियाणा ) येथील आहेत.  11 महिला व 10 पुरुष असा एकूण 21 चोरट्यांचा समावेश आहे. यामुळे पंढरपूर मधील वारीत पाकिट मारीच्या घटनांमध्ये काही अंशी घट होणार आहे.