होमपेज › Solapur › पंढरपुरात रेल्वे पोलिस चौकीतच जुगार अड्डा

पंढरपुरात रेल्वे पोलिस चौकीतच जुगार अड्डा

Published On: Feb 02 2018 8:31PM | Last Updated: Feb 02 2018 8:31PMपंढरपूर: प्रतिनिधी

पंढरपूर रेल्वे स्थानक पोलिस चौकीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत २ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याचबरोबर १९ जुगाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे यामध्ये रेल्वे पोलिसांचे २ कर्मचारीही आहेत.

पंढरपूर येथील रेल्वे स्थानकातील पोलिस चौकीत गेल्या अनेक वर्षांपासून जुगार चालत होता. पोलिस चौकीतच हा जुगार सुरू असल्यामुळे त्यावर कुणीही आजवर कारवाई केली नव्हती. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी २ लाख ४० हजार रुपये रोकड आणि ९ मोटार सायकली सह १९ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये रेल्वे पोलिसांचे २ कर्मचारीही आहेत. या सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.