Wed, Aug 21, 2019 15:38होमपेज › Solapur › सोलापूरात जुगार खेळताना सापडले पोलिस

सोलापूरात जुगार खेळताना सापडले पोलिस

Published On: Mar 24 2018 1:32PM | Last Updated: Mar 24 2018 1:32PMसोलापूर : प्रतिनिधी

न्यू पाच्छा पेठेतील पांडुरंग भीमराव जाधव याच्या वाड्यात असलेल्या  जुगार अड्ड्यावर  शहर गुन्हे  शाखेच्या  पोलिसांनी  छापा टाकला. यावेळी अंदर-बाहर जुगार खेळणार्‍या सहायक फौजदार, तीन पोलिस कर्मचार्‍यांसह ७ जणांना ताब्यात घेऊन पळून गेलेल्या ३ व्यक्तींसह ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. 

वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार अल्लाबक्ष सत्तार सय्यद (वय ५६, रा. रविवार पेठ, बोरामणी नाका चौकाजवळ, सोलापूर), कामती पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक भरत देवू बागल (ब. नं. १८२३, वय ३०, रा. न्यू पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर), वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक रशीद अब्दुल शेख (ब. नं. १७७५, वय ३२, रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर), सदर  बझार पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राजशेखर शिवप्पा कटारे (ब. नं. १०१७, वय ४९ रा. राघवेंद्र  नगर, सैफुल, सोलापूर), संतोष सुरेश मुदगल (वय २४, रा. न्यु पाच्छा पेठ, सोलापूर), मदन श्रावन बेलभंडारी (वय ३०, रा. न्यु पाच्छा पेठ, अशोक चौक, सोलापूर) अशी जुगार अड्ड्यातून  ताब्यात  घेतलेल्या पोलिसांची  नावे असून जुगार अड्डा चालक रमशे पांडुरंग जाधव आणि पळून गेलेल्या ३ अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील  सर्व  प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व शहर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. शुक्रवारी रात्री पोलिस आयुक्त तांबडे यांना अशोक चौकातील मस्ताना हॉटेलच्या मागे राहणार्‍या पांडुरंग भीमराव जाधव याच्या वाड्यामध्ये एका खोलीमध्ये जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन त्यांनी यावर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्‍यांना सांगितले होते.