Sat, Aug 24, 2019 23:30होमपेज › Solapur › वेलकम गड्डा

वेलकम गड्डा

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:43PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रा काही दिवसांवर येऊन ठेवली असून शहरात सिद्धेश्‍वर यात्रेची व तयारीची लगबग सुरू झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. होम मैदानावर मोठ मोठे पाळणे, ड्रॅगन पाळणे, मौत का कुआ, रसपानगृहे, वडापावची दुकाने, इमिटेशन ज्वेलरी, महिलांना लागणार्‍या वस्तुंच्या दुकानांसह आदी स्टॉल उभे केले जात आहेत.

गेल्या नऊशे वर्षांपासून अखंडपणे मोठ्या उत्साहत सिद्धेेश्‍वर यात्रा साजरी करण्यात येते. या यात्रेसाठी सोलापूर शहर, जिल्हा तसेच परराज्यातूनही मोठ्या संख्येने भक्त सोलापूरच्या पुण्यनगरीत दाखल होतात. या यात्रेत नागरिक ज्या गड्ड्याची वर्षभर आतूरतेने वाट पहात असतात, तो गड्डा संपूर्ण होम मैदानावर भरवण्यात येत आहे. त्यामुळे जानेवारीत संपूर्ण होम मैदान, सिद्धेश्‍वर मंदिर परिसर विद्युत रोषणाईने व गर्दीने गजबजून जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. गड्डा भरवण्यासाठी परराज्यातील व्यावसायिक पाळणे तसेच मनोरंजनाचे विविध साहित्य घेऊन सोलापुरात दाखल होत आहेत. याचबरोबर शहरात नंदीध्वजधारक नंदीध्वज पकडण्याचा सराव करत आहेत. त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहर सिद्धेेश्‍वरमय झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

प्रसिद्धी व प्रचार प्रमुख अ‍ॅड.एस. आर. पाटील व बाळासाहेब भोगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी गड्डा यात्रेत 210 स्टॉलधारकांनी  बुकिंग केली आहे. गेल्या 900 वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मंदिर सजावट, रंगरंगोटी, नंदीध्वज मार्गातील वाहतूक व्यवस्था, होम मैदानावरील खेळणी, दुकाने, स्टॉल्स उभारणी  तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिली. यण्णीमंजन  व अक्षता सोहळ्यानंतर गड्डा यात्रेत खरी गर्दी पहावयास मिळणार आहे. गड्ड्यात महाराष्ट्रभरातून लोक दाखल होतात.होम मैदानावर जवळपास 40 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. याचबरोबर वाहतूक व्यवस्था म्हणून बॅरेगेटही लावण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे.  

पाण्याचा सडा
होम मैदानावर भरवण्यात येणार्‍या गड्ड्यात धुळीचा मोठा प्रश्‍न निर्माण होतो. धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी मंदिर समिती व मनपा प्रशासनाच्या सहकार्याने गड्ड्यात टँकरद्वारे पाण्याचा सडा मारण्यात येणार असल्याची माहिती सिद्धेेश्‍वर देवस्थानाकडून सांगण्यात आली. दिवसभरातून कमीत कमी दोन वेळा हा पाण्याचा सडा मारण्यात येणार आहे. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची  विशेष काळजी घेतली जाणार आहे.