Sun, Jul 21, 2019 06:20होमपेज › Solapur › 15 दिवसांत दिव्यांगांच्या निधीचा विनियोग करा!

15 दिवसांत दिव्यांगांच्या निधीचा विनियोग करा!

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 10:40PMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिकेने नियमानुसार  दिव्यांग निधीचा विनियोग करावा याकरिता 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, जर ही मागणी बेदखल झाल्यास आपल्या प्रहार स्टाईलने मनपात येऊ, असा इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी  सोमवारी दिला.

महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या एकूण रकमेच्या तीन टक्के रक्‍कम दिव्यांग  निधीसाठी तरतूद करावी, असा नियम आहे. मात्र, मनपाकडून गेल्या अनेक वर्षांपासून याची अंमलबजावणी होत नाही. याबाबत विविध संघटनांनी अनेकदा आवाज उठविला. मात्र प्रशासन त्याला दाद देत नाही, असे चित्र आहे.  या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सोलापूर दौर्‍यावर आलेले प्रहार संघटनेचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी हा प्रश्‍न ऐरणीवर आणला. याबाबत त्यांनी महापालिकेत येऊन आयुक्‍त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. कडू म्हणाले, मनपाच्या मागच्या बजेटमध्ये तरतूद केलेला तीन कोटींचा निधी अखर्चित आहे. हा निधी खर्च करावा, अशी मागणी आपण आयुक्‍तांकडे केली आहे. नव्या नियमानुसार दिव्यांग  निधी 3 ऐवजी 5 टक्के इतका ठेवावा लागणार आहे. ही टक्केवारी लक्षात घेता मनपाने तीन कोटींची तरतूद करण्याची गरज आहे. पिंपरी-चिंचवड, वसई मनपाने याची अंमलबजावणी केली आहे. मग ‘अच्छे दिन’वाल्यांचे असलेल्या सोलापूर मनपाने अपंगांना ‘बुरे दिन’ का आणावे, असा सवाल कडू यांनी केला. 

भाजपच्या डीएनएमध्ये निम्मे काँग्रेस-राष्ट्रवादी 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अनधिकृत बंगल्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी गप्प आहे. याबाबत विचारले असता आ. कडू म्हणाले, भाजपच्या डीएनएची तपासणी केली तर त्यामध्ये निम्मी काँग्रेस-राष्ट्रवादी असल्याचे दिसून येईल. भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले हे सर्वजण भाऊ-भाऊ आहेत या शब्दांत आ. कडू यांनी टोला लगाविला. आ. कडू  मनपात येणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी कार्यकर्ते तसेच 70 फूट रोडवरील विक्रेत्यांची मोठी गर्दी झाली होती.