Mon, Apr 22, 2019 02:19होमपेज › Solapur › जिल्ह्यातील 23 हजार रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

जिल्ह्यातील 23 हजार रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया

Published On: Mar 17 2018 11:28PM | Last Updated: Mar 17 2018 10:50PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

महिला दिनाचे औचित्य साधून आयोजिलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरातील 23 हजार 400 रुग्णांच्या लहान व मोठ्या शस्त्रक्रिया स्थानिक खासगी रुग्णालयात केल्या जाणार आहेत. यासाठी बाहेरुन तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून उस्मानाबादेत हे शिबिर झाले होते. 

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आ. सुजितसिंह ठाकूर यांनी उस्मानाबादेत चार मार्चला हे शिबिर घेतले होते. त्यात तब्बल 1 लाख 22 हजार महिला व बाल रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. उदंड प्रतिसाद मिळाल्याने मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रालयात आ. ठाकूर यांच्यासह मंत्री महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे अभिनंदन केले. दरम्यान, यातील 23 हजार 400 रुग्णांवर आता छोट्या, मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. त्याची व्यवस्था स्थानिक पातळीवर केली जाणार आहे. यासाठी बाहेरुन तज्ज्ञ डॉक्टरही बोलावून घेतले जाणार आहेत. शिवाय अतिशय गरजू रुग्णांना बाहेरगावी नेऊन उपचार केले जाणार आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचाही आढावा घेतला. या योजनेंतर्गत रुग्णालयांची संख्या कमी असल्याने इतर खासगी रुग्णालयांना जीवनदायी योजनेचे पोर्टल जोडून त्याठिकाणी उपचाराची सोय केली जाणार आहे. यासाठी विमा कंपनीने सहकार्य करावे, असे आदेश सरकारने दिले. 

आ. ठाकूर यांचा पुढाकार

जिल्ह्यात 4 तारखेला झालेले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी भाजपचे आ. सुजितसिंह ठाकूर यांनी स्वत: नियोजन केले होते. शिबिराची प्रसिध्दीही मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णांची गर्दी झाली. याचा फायदा त्यांनाच होत आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ठाकूर यांचेही कौतुक केले, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिली.