Fri, Apr 26, 2019 09:24होमपेज › Solapur › ‘गरिमा’च्या फसवणुकीची रक्‍कम 4 कोटींच्यावर!

‘गरिमा’च्या फसवणुकीची रक्‍कम 4 कोटींच्यावर!

Published On: May 31 2018 10:59PM | Last Updated: May 31 2018 10:09PMसोलापूर : अमोल व्यवहारे

ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारून परताव्याच्या बदल्यात प्लॉट देण्याचे आमिष दाखवून शहरातील हजारो गुंतवणूकदारांना गंडविणार्‍या ‘गरिमा गु्रप ऑफ कंपनी’च्या फसवणुकीची रक्‍कम ही 4 कोटी रुपयांच्यावर गेली असून फसलेल्या गुंतवणूकधारकांचीही संख्याही 850 च्या वर गेली आहे. गरिमाकडून फसलेल्या गुंतवणूकदारांची संख्या ही हजारोंच्या घरात असून   फसलेल्या गुंतवणूकदारांनी आयुक्‍तालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

प्रकाश चंद्रशेखर डमामी (वय 41, रा. प्लॉट नं. 19, साम्राज्यनगर, शेळगी, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन बनवारीलाल माधवसिंग कुशवाह, शिवराम माधवसिंग कुशवाह, बालकिशन माधवसिंह कुशवाह, शोभाराणी बनवारीलाल कुशवाह, बेनीसिंग नथीलाल कुशवाह (सर्व रा. जमालपूर, जि. धोलपूर, राजस्थान), राजेंद्र पुराण रजपूत (रा. बहरबली सैपु, पो. चितोरा, जि. धोलपूर, राजस्थान), रोहित फकीरचंद बनेत (रा. कुरूक्षेत्र, हरियाणा) यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिस  ठाण्यात 18 एप्रिल 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनवारीलाल कुशवाह व इतर आरोपींनी गरिमा फायनान्स सुरु केले होते. सन 2011 मध्ये सोलापुरातील नवी पेठेतील ढंगे कॉम्प्लेक्स येथे गरिमा फायनान्सचे कार्यालय थाटून संचालक मंडळाने प्रकाश डमामी व फायनान्सच्या एजंटांना फायनान्समध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानंतर त्यांना परताव्याच्या बदल्यात प्लॉट देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील अनेकांनी या फायनान्समध्ये गुंतवणूक म्हणून ठेवी ठेवल्या. मुदत संपल्यानंतर ठेवी परत मागितल्या असता त्या संचालक मंडळाने परत दिल्या नाहीत की त्या बदल्यात प्लॉटदेखील दिला नाही.  

तसेच ठेवीदारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता फायनान्सचे कार्यालय बंद केले  म्हणून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात डमामी व इतर पाच लोकांची मिळून 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

गरिमाकडून फसवणूक झालेल्या ठेवीदारांची संख्या ही वाढत असून आयुक्‍तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत दररोज 50 पेक्षा जास्त ठेवीदार फसवणूक झाल्याबाबतची कागदपत्रे जमा करण्यासाठी येत आहेत. सध्या फसवणूक झालेल्या ठेवीदारांची संख्या ही 850 च्या वर गेली असून फसवणुकीची रक्‍कमदेखील 4 कोटी रुपयांच्यावर गेली आहे. फसवणुकीची रक्‍कम व गुंतवणूकदारांची संख्या ही वाढतच जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.