Wed, Aug 21, 2019 01:54होमपेज › Solapur › लेखापरीक्षणाच्या नावाखाली बँकेला गंडवले; 7 जण बडतर्फ

लेखापरीक्षणाच्या नावाखाली बँकेला गंडवले; 7 जण बडतर्फ

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:49PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी  

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकेंतर्गत राबविलेल्या सतत समवर्ती लेखापरीक्षणातून बँकेला सातत्याने फसविणारे अनेक कर्मचारी सापडले असून यापैकी 7 जणांना नोकरीतून बडतर्फ, तर दोघांना निलंबित केले असून एकाची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अनेक शाखांमध्ये सातत्याने तेच कर्मचारी काम करत असल्याने अनेक ठिकाणी गैरव्यवहार आणि अफरातफर होत असल्याचा तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बँकेने अंतर्गत कर्मचार्‍यांचे पथक तयार करून सतत समवर्ती लेखापरीक्षण केले. यामध्ये अनेक शाखांमधील गैरव्यवहार सापडले असून अनेक कर्मचार्‍यांची मनमानीही पुढे आली आहे. यामध्ये घेरडी शाखेत काही दिवसांपूर्वीच 2 कोटी 20 लाख रुपयांची अफरातफर झाली होती. यामध्ये बँक इन्स्पेक्टर एस. बी. आलदर, कॅशिअर एस. बी. गावडे, लिपिक एस. डी. कुलकर्णी, लिपिक एस. एम. घुणे, शिपाई एस.एन. करे,  एस.जे. गावडे यांना सेवेतून बडतर्फे करण्यात आले आहे. रोपळ शाखेतील लिपीक एस.ए. कदम यांनी 22 लाख रुपयांची अफरातफर केल्याने त्यांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सांगोला शाखेचा शिपाई एस.आर. वाईकर आणि वांगी शाखेतील पी.डी. सातपुते हे कामावर सातत्याने गैरहजर राहत असल्याने त्यांना निलंबित करुन त्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेतील पारदर्शक कामासाठी आणि सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या विश्‍वासाला पात्र राहण्यासाठी हे सतत समवर्ती लेखापरिक्षण सातत्याने चालूच ठेवण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्यामुळे यापुढे बँकेत गैरव्यवहार करणार्‍यांची यापुढे गय केली जाणार नसल्याचा इशारा राजन पाटील यांनी दिला आहे.