Thu, Jun 20, 2019 07:02होमपेज › Solapur › थायलंड सहलीच्या आमिषाने 4 लाखांची फसवणूक

थायलंड सहलीच्या आमिषाने 4 लाखांची फसवणूक

Published On: May 31 2018 10:59PM | Last Updated: May 31 2018 10:29PMसोलापूर : प्रतिनिधी

थायलंड सहल रद्द करून सोलापूरच्या 17 जणांची 4 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्याच्या सिंहगड ट्रॅव्हल्सच्या मालकाविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंडित बसवंत बनसोडे (वय 44, रा. गोकुळनगर, जुळे सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून सिंहगड ट्रॅव्हल्स एजन्सीचे सचिन विष्णू गायकवाड (रा. अंबेगाव, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडित बनसोडे यांची जुळे सोलापुरात  ज्योतिराम टूर्स  अँड  टॅ्रव्हल्स नावाची कंपनी आहे. जानेवारी 2018 मध्ये बनसोडे यांच्या ज्योतिराम टूर्स अँड  ट्रॅव्हल्समार्फत पुण्याच्या सिंहगड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या सचिन गायकवाड यांच्याकडे सोलापुरातील अनेकांनी थायलंड सहलीसाठी पैसे भरले होते. या सहलीमध्ये प्रवाशांचे विमान तिकीट, राहणे, खाणे व फिरण्याचा समावेश होता.

बनसोडे यांच्यासह त्यांच्यामार्फत 17 जणांनी 6 लाख 61 हजार रुपये सिंहगड एजन्सीकडे भरले होते. परंतु सिंहगड एजन्सीने थायलंड सहल रद्द केली. त्यामुळे सहलीचे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे बनसोडे व इतरांनी त्यांचे पैसे परत मागितले. त्यावेळी गायकवाड यांनी 4 लाख 90 हजार रुपये परत केले. परंतु उर्वरित पैशासाठी बनसोडे यांच्यासह 17 जणांनी तगादा लावला असता गायकवाड याने पैसे दिले नाहीत. उलट टोलवाटोलवी केली म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात 4 लाख 10 हजारांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक चौगुले तपास करीत आहेत.