Fri, Jul 19, 2019 01:22होमपेज › Solapur › अटलजींच्या आठवणींनी अश्रू अनावर

अटलजींच्या आठवणींनी अश्रू अनावर

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 9:06PMसोलापूर ः प्रतिनिधी 

भाजपचे प्रथम अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने  सोलापूरवर  शोककळा  पसरली. अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. शासकीय रुग्णालयाजवळील  भाजपच्या कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.  स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

सुमारे अर्धा-एक तास मौन पाळून सार्‍यांनी अटलजींचे स्मरण केले. आज कुणीही भाषण केले नसले तरी त्यांच्या सोलापुरातील आठवणी, त्यांचे कार्य स्मरुन अनेकांना हुंदका आवरता येत नव्हता. त्यामुळे अतिशय दुःखद शांततेमध्ये  येत  होता  तो फक्त हुंदक्यांचा आवाज. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, दत्ता गणपा, हेमंत पिंगळे, शोभा बनशेट्टी, प्रभाकर जामगुंडे, शशिकला बत्तुल, वीरभद्रेश बसवंती, मल्लेश कावळे, रामचंद्र जन्नू, सुरेश चिक्कळ्ळी, श्रीनिवास दायमा, रामेश्‍वरी बिरु, सोनाली मुटकेरी, संतोष भोसले, श्रीनिवास करली, नारायण बनसोडे, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, वृषाली चालुक्य, संदीप जाधव, शोभा नष्टे, राजकुमार पाटील, चन्नवीर चिट्टे, मोहन डांगरे, मंजुनाथ कक्कळमेली, शिवानंद पाटील, जाकीर डोका, पाशाभाई शेख,  सचिन लड्डा, छोटू गंजी,  सुनील टोणपे, श्रीधर गोखले, नारायण जाधव  यांच्यासह  शहर भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण येमूल यांचा कालपासून अन्नत्याग

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सोलापूर दौर्‍यावेळी त्यांच्या खोलीचा सेवक म्हणून काम केलेले लक्ष्मण येमूल यांनी अटलजींच्या निधनामुळे कालपासून अन्नत्याग केला आहे. सोलापुरात लाल बावटा आणि काँग्रसेशिवाय कोणताच झेंडा लोकांना माहिती नव्हता. त्यावेळी अटलजींच्या सभेनंतर आम्ही लोकांनी भाजपच्या झेंड्याची ओळख केली आणि आज केवळ अटलजींमुळेच सोलापुरात भाजप रुजली असून त्यांच्या खोलीत त्यांच्या सेवेसाठी माझी नेमणूक झाली तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता. त्यावेळी त्यांनी मला कोणतेही काम करू दिले नाही. त्यांचे कपडेसुध्दा त्यांनी मला धुवायला दिले नाहीत. भाजपच्या कार्यकर्त्यांची इतकी काळजी ते घ्यायचे. ते गेल्याने माझ्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याचे दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर बार असोसिएशनचे आज काम बंद

सोलापूर जिल्हा न्यायालताही वकिलांच्या संघटनेने (सोलापूर बार असोसिएशन) आज दिवसभर काम बंद ठेवून दुखवटा पाळला. यावेळी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अ‍ॅड. किशोरसिंह राजपूत यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

शनिवारी शोकसभा

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त शनिवारी (18 ऑगस्ट) रोजी सायंकाळी 5 वाजता रंगभवन सभागृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली.

प्रभाग क्रमांक 19

मानाचा श्री शिवगणेश मंदिर येथील सर्व सूचना फलकांवर अटलजींच्या निधनाचे वृत्त देत श्रध्दांजलीचा मजकूर लिहिण्यात आला होता. सर्व छोट्या-मोठ्या सूचनाफलकांवर अटलजींचे फोटो लावून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

प्रभाग क्रमांक 4

प्रभाग क्रमांक चारमध्ये  नगरसेवक विनायक विटकर आणि मित्रपरिवाराने लक्ष्मण महाराज प्रवेशव्दार येथे रस्त्यावर अटलजींच्या प्रतिमेचा श्रध्दांजलीचा मोठा फ्लेक्स लावला. सुमारे 50 कार्यकर्त्यांनी एकत्र येत अटलजींना श्रध्दांजली वाहिली आणि ‘अटलबिहारी अमर रहे’च्या घोषणा दिल्या.