Sun, May 19, 2019 23:00होमपेज › Solapur › राष्ट्रीय पातळीवर राजकारण करणाऱ्यांनी यापुढे सामंजस्याने वागावे

राष्ट्रीय पातळीवर राजकारण करणाऱ्यांनी यापुढे सामंजस्याने वागावे

Published On: May 05 2018 2:51PM | Last Updated: May 05 2018 2:56PMपंढरपूर : प्रतिनिधी

२०१४ साली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला नसता तर भाजप सरकार आलेच नसते. राष्ट्रीय पातळीवर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी यापुढे तरी सामंजस्याने वागावे असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येथे बोलताना म्हणाले. 

काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष झाले गेले विसरून नव्याने आघाडी करून २०१९ च्या तयारीत असताना, पृथ्वीराज बाबांचा राग मात्र अजूनही गेला नसल्याचे या वक्तव्यावरून दिसत आहे. शनिवारी सोलापूर येथे एका कार्यक्रमासाठी निघालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, त्यावेळी आमचं सरकार पाडलं नसतं तर भाजप सरकार येणे शक्यच नव्हते. आघाडी मोडली म्हणून हे सरकार आले. आता तरी राष्ट्रीय पातळीवर राजकारण करणाऱ्या नेत्यांनी समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न केले पाहिजेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हा नाव न घेता टोला असल्याचे मानले जात आहे. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. साखरेच्या दरातील अस्थिरता लक्षात घेता उसाच्या एफआरपी धोरणाचा फेरविचार करावा लागेल असेही चव्हाण म्हणाले.

Tags : former Cm prithviraj chavan,  congress, ncp, alliance, Legislative Council election, sharad pawar