होमपेज › Solapur › सोलापूर विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये डॉ. मालदार यांचा सिंहाचा वाटा

सोलापूर विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये डॉ. मालदार यांचा सिंहाचा वाटा

Published On: Dec 13 2017 2:00AM | Last Updated: Dec 12 2017 10:47PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये डॉ.एन.एन. मालदार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे गौरवोद‍्गार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एम.जी. ताकवले यांनी काढले. 

हि.ने. वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटर सभागृहामध्ये सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समितीच्यावतीने सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.एन. मालदार यांच्या हस्ते कार्याचा गौरव म्हणून त्यांचा डॉ. ताकवले यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे, माजी प्राचार्य के.एम. जमादार, प्राचार्य डॉ.बी.एम. भांजे, परीक्षा नियंत्रक डॉ.बी. पी. पाटील, डॉ.बी.एन. कांबळे आदी उपस्थित होते. प्रारंभी सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समितीचे अध्यक्ष उल्हास पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. 

सोलापूर विद्यापीठ स्थापन करण्यामागील पार्श्‍वभूमी सांगून डॉ. ताकवले म्हणाले, विद्यापीठांनी कॅम्पसच्या विकासाबरोबर संलग्‍नित महाविद्यालयाच्या प्रगतीचाही विचार करावा. विद्यापीठाच्या विकासासाठी सरकारकडून भरीव निधी मिळत नाही. त्यासाठी स्वतःच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत शोधणे आवश्यक आहे. डॉ. मालदार यांच्या कुलगुरुपदाच्या कालावधीत सोलापूर विद्यापीठ विकासाची पहिली पायरी यशस्वीपणे चढली आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यास मुंबई-पुण्याकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो थांबण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. 
याप्रसंगी प्राचार्य भांजे, डॉ. कांबळे व पाटील यांनी डॉ. मालदार यांच्यासमवेत काम करताना आलेले अनुभव सांगून त्यांचे व्यक्‍तिमत्त्व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नभा काकडे यांनी केले, आभार डॉ.एम.ए. दलाल यांनी मानले.