Sun, Aug 18, 2019 20:36होमपेज › Solapur › पंढरीत दोन लाखांवर भाविक दाखल

पंढरीत दोन लाखांवर भाविक दाखल

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 17 2018 10:41PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. पालख्यांनी जिल्ह्यात प्रवेश केला असल्याने पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. दर्शन रांग पत्राशेडपर्यंत पोहोचली असून पंढरीत दोन लाखांवर भाविक दाखल झाले आहेत.

आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक दाखल होऊ लागले आहेत. संत ज्ञानेश्‍वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे लहान-मोठ्या दिंड्याही पंढरीत दाखल होऊ लागल्या आहेत. अनेक भाविक पंढरीत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी व पालखीत सहभागी होऊन पंढरीस येण्यासाठी जात आहेत. यामुळेही पंढरीत भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग व प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी गजबजला आहे.

चंद्रभागेत स्नान करून भाविक मुख दर्शनाबरोबर पदस्पर्श दर्शन घेण्यावर भर देत आहेत. दर्शन रांगेतून दर्शन घेण्याकडे भाविकांचा कल अधिक असल्याने मंगळवारी सायंकाळी दर्शन पत्राशेडपर्यंत पोहचली असून या दर्शन रांगेत 35 ते 40 हजार भाविक दाखल झाले आहेत. दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्यावतीने शुद्ध पिण्याचे पाणी, चहा मोफत देण्यात येत आहे. दर्शन रांगेत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचबरोबर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाच्यावतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, शौचालये, आपतकालीन मदत केंद्र, आदींची व्यस्था करण्यात आली आहे.