Mon, Jul 22, 2019 02:38होमपेज › Solapur › ‘त्या’ घटनेमुळे शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्या : रविकांत तुपकर

‘त्या’ घटनेमुळे शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्या : रविकांत तुपकर

Published On: Jun 23 2018 10:57PM | Last Updated: Jun 23 2018 10:22PMपंढरपूर : तालुका प्रतिनिधी

पीककर्ज मंजूर करण्यासाठी शेतकरी पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली जाऊ लागली आहे.  या घटनेमुळे शेतकर्‍याचा अपमान झाला आहे. संतापजनक घटनेमुळे शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्या असून त्या बँक मॅनेजरला दिसेल तिथे ठोकून काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  रविकांत तुपकर यांनी दिला.  

पुणे येथे 29 जून रोजी साखर आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानीच्यावतीने कैफीयत मोर्चा काढला जाणार आहे. त्याअनुषंगाने तुपकर सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. दरम्यान शनिवारी पंढरपूर येते त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुढे बोलताना तुपकर म्हणाले की, उसाला प्रतिटन एफ.आर.पी. अधिक 400 रूपये देण्याचे आश्‍वासन  देऊनही ते न पाळणार्‍या सहकारमंत्र्यांनी ऊस उत्पादकांचा विश्वासघात केला आहे. सत्तेत येत असताना भाजपाने शेतकर्‍यांना विविध प्रकारची आश्‍वासने दिली मात्र, सत्तेत आल्यानंतर सर्व आश्‍वासनांचा त्यांना विसर पडला आहे. एका बाजूला विजय मल्या, नीरव मोदी सारखे उद्योजक कर्ज बुडवून परदेशात पळून जातात, दुसर्‍या बाजूला 10 हजार रूपयांसाठी शेतकर्‍यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. हे सरकारचे अपयश आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ 6 ते 7 टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांकडून मंत्र्यांना गावबंदी घातली पाहिजे, असेही तुपकर म्हणाले.

 आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी हातकणंगले, माढा, वर्धा, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा या सहा याठिकाणी लढणार आहे. माढा मतदारसंघातून खा. शेट्टी यांनी आदेश दिले आणि शेतकर्‍यांनी मागणी केली तर आपण निवडणूक लढवू, अशीही पुस्ती तुपकर यांनी जोडली. 

यावेळी कार्य. सदस्य विष्णू बागल, जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जिल्हा संघटक विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष तानाजी बागल, नवनाथ माने, युवा आघाडी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, अ‍ॅड. राहुल घुले,  अ‍ॅड. विजयकुमार नागटिळक, शिवाजी चव्हाण, किर्तीकुमार गायकवाड, अमर इंगळे, रणजीत बागल, विश्रांती भुसनर, निवास भोसले आदी उपस्थित होते.