Mon, Aug 19, 2019 01:14होमपेज › Solapur › ब्लॉग : विमानाचं राहू द्या, बसचं तेवढं बघा

ब्लॉग : विमानाचं राहू द्या, बसचं तेवढं बघा

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 15 2018 5:09PMसोलापूर : श्रीकांत साबळे

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उड्डान योजनेतून लवकरच सोलापुरातून विमान टेक ऑफ घेईल, अशा सातत्याने घोषणा करणारे खा. शरद बनसोडे यांच्या जन्मभूमी असलेल्या पानमंगरुळ या गावातील बससेवा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे बनसोडेसाहेब, विमानाचं राहू द्या, तेवढं बससेवेचे बघा, अशी आर्तहाक ग्रामस्थ घालत आहेत. याची दखल खा. बनसोडे घेतील का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे खा. शरद बनसोडे यांचे जन्मगाव अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ हे असून, या गावची लोकसंख्या 7 ते 8 हजारांच्या आसपास आहे. याठिकाणचे ग्रामस्थ आणि विद्यार्थी दैनंदिन गरजा आणि शालेय शिक्षणासाठी सोलापूर शहरात ये-जा करत असतात. सोलापूर हे पानमंगरुळ गावाला मध्यवर्ती केंद्र असून, या गावाला महापालिका परिवहन विभागाकडून दैनंदिन दळण-वळणासाठी डेली दोन बसेस सोडण्यात येत होत्या. परंतु गत दोन महिन्यांपासून परिवहन विभागाने रस्त्यावरील खड्डे आणि आर्थिकस्त्रोत्र याचा विचार करुन बसेस बंद केल्या आहेत. यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, दोन महिन्यांपूर्वी परिवहन विभागाने खड्डे पडल्याने सातत्याने टायर खराब होऊ लागल्यामुळे परिवहनची बस बंद केली होती. तब्बल पंधरा दिवस या मार्गावर एकही बस धावत नव्हती. अखेर ग्रामस्थांच्या जनरेट्यापुढे नमते घेत परिवहन व्यवस्थापनाने एक बस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या एकाच बसवर सगळा भार पडत आहे. एकच बस गावात येत असल्यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदारवर्ग यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.

यासंदर्भात काही ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, गावचा भूमीपुत्र देशाच्या संसदेत प्रश्‍न मांडतो, मात्र त्यांना गावातील प्रश्‍न दिसून येत नाहीत, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.

राज्य परिवहनची बसच नाही

सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याच्या सेंटरवर असलेले आणि तब्बल 8 हजार लोकसंख्या असलेले पानमंगरुळ हे गाव खा. बनसोडे यांच्या कर्तृत्वाने उजेडात आले असले तरी, या गावात अद्यापपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची एकही बस धावलेली नाही. ‘गाव तिथे एसटी’, अशी संकल्पना असली तरी पानमंगरुळ हे गाव या संकल्पनेला अपवाद असल्याचे दिसून येते. 

विमानाचे राहू द्या, आधी बसचं बघा!

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण योजनेत सोलापूरचा समावेश होऊन वर्ष लोटत आले तरी अद्यापही सोलापूरची विमानसेवा काही केल्या सुरू झालेली नाही. अशाही परिस्थितीत प्रत्येक सोलापूरच्या दौर्‍यात खा. बनसोडे हे सोलापूरची विमानसेवा लवकरच सुरू होईल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात. त्यामुळे विमानसेवा सुरू होणार नेमकी कधी, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते. खा. बनसोडे यांच्या या विधानामुळे संतापलेले ग्रामस्थ मात्र,  साहेब विमानाचं राहू द्या, बसचं तेवढं बघा, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.