Thu, Apr 25, 2019 18:10



होमपेज › Solapur › पाण्याअभावी 65 एकरात भाविकांचे हाल

पाण्याअभावी 65 एकरात भाविकांचे हाल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पंढरपूर : प्रतिनिधी

चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा  मंगळवारी साजरा होत आहे. यानिमित्ताने भाविकांसाठी 65 एकर येथे अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवण्यात येत आहेत. मात्र एकादशीच्या आदल्या दिवशी येथे दाखल झालेल्या 50 हजार भाविकांना मात्र पिण्याचे पाणी व प्रथमोपचार केंद्र उपलब्ध नसल्याने हाल सोसावे लागले.  प्रशासनाने वेळेत अत्यावश्यक सेवासुविधा पुरवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

चैत्री एकादशीच्या सोहळ्याकरिता राज्याच्या कानाकोपर्‍यातून  लाखो भाविक  पंढरीत येत आहेत.  यानिमित्ताने प्रशासनाच्या वतीने भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालये, वीज, प्रथमोपचार केंद्र आदी अत्यावश्यक  सेवा सुविधा पुरविण्यात येतात.  त्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने नियोजनही करण्यात आले आहे. परंतु त्याची अधिकारी व कर्मचार्‍यांकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही. सोमवारी दुपारपर्यंत 65 एकर येथे एकूण 383 प्लॉट पैकी  50 प्लॉटचे बुकिंग पूर्ण झाले आहे. बुकिंग केलेल्या प्लॉटवर भाविकांकडून तंबू , राहुट्या उभारण्यात येत आहेत.  येथे प्रवेशव्द्वारावर पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन व्यवस्थापन केंद्रातून योग्य ते मार्गदर्शनही केले जात आहे.

परंतु, भाविकांना पुरेसा पाणी पुरवठा केला जात नाही. केवळ 2 टँकर याठिकाणी पाणी पुरवठ्याकरिता ठेवले आहेत. यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. प्रथमोपचार केंद्र नसल्याने भाविकांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.  येथे उभारण्यात आलेल्या काही कायम स्वरुपी शौचालयांची कामे पूर्ण झाली नसल्याने तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली आहे. 65 एकर येथे दाखल झालेल्या भाविकांना स्वयंपाक करण्यासाठी लागणारे रॉकेल व गॅस पुरविणारी यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे अनेक भाविकांना जेवन बनविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेकडो मैल पायी चालत आलेल्या भाविकांना अत्यावश्यक सेवा सुविधा प्रशासनाने पुरवाव्यात अशी मागणी होत आहे.

Tags : Salapur, Solapur News, Chaitra Yatra, 50 thousand devotees, had to suffer, lack of drinking water, first aid centers






  •