Sun, Mar 24, 2019 10:49होमपेज › Solapur › 54 वर्षे अविरत शिक्षणार्थींची भूक भागविणारा ‘डबेवाला’

54 वर्षे अविरत शिक्षणार्थींची भूक भागविणारा ‘डबेवाला’

Published On: Jun 09 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 11:25PMसोलापूर : दीपक होमकर

घरात अठराविश्‍व दारिद्य्र. मात्र शिक्षणाची जबरदस्त इच्छाशक्ती. मात्र गावात फक्त बारावीपर्यंतचंच शिक्षण. पुढं शिकायचं तर शहरात जावं लागणार. त्याचीही तयारी झाली खरी, पण राहायचं कुठ, खायचं काय? मात्र म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग असतोच. जिल्हा परिषदेच्या नेहरू हॉस्टेलमध्ये  अतिशय कमी खर्चात राहायची सोय झाली. पोटाची आग रोज कशी विझवायची आणि ती आग शमविण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक 17-18 वर्षांचा तरुण पुढे आला. मुलांच्या  घरातली डबा त्यांच्या हॉस्टेलपर्यंत पोहोचविण्याचे काम करायला लागला. पाहता पाहता तब्बल 54 वर्षे तो डबा पोहोचविण्याचे काम अखंडपणे करायला लागला आणि हजारो मुले त्यांच्या डब्याच्या भरवशावर शहरात शिक्षणाला आले आणि अगदी राजकारणापासून ते सैन्यदलापर्यंत, इंजिनिअरिंपासून डॉक्टरपर्यंत, प्राध्यापकांपासून शिक्षकांपर्यंत आणि लिपिकापासून ते शिपायापर्यंत हजारो पोरांचं करिअर घडलं.

ही एखादी दंतकथा नाही, तर वयाच्या सत्तराव्या वर्षातही ग्रामीण भागातून शहरात शिकायला येणार्‍या मुलांना अगदी दररोज न चुकता त्यांच्या हॉस्टेलपर्यंत डबा पोहोचविणार्‍या सोमशंकर काळकप्पा कटारे यांची ही सत्यकथा आहे. मुंबईतले डबेवाले यांची ख्याती जगभर आहे. अगदी न चुकता ज्याचा त्याचा डबा वेळेत जाण्याबाबत त्यांनी जागतिक विक्रम केला. त्यासाठी त्यांना त्यांच्या संघटनात्मक चेन सिस्टिमचा मोठा उपयोग झाला. मात्र हा सोलापूरचा डबेवाला अगदी वन मॅन आर्मी असूनही ज्याचा त्याचा डबा अगदी वेळेत ज्याच्या त्याच्या रुमपर्यंत पोहोच करतो. हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. करजगी, मंगरुळ, तडवळ, गड्डेवाडी, खानापूर, म्हैसलगी, आळगी, शेगाव, मुंढेवाडी अशा नऊ गावांतील विद्यार्थ्यांचे डबे सोलापुरातील नेहरु हॉस्टेल, संगमेश्‍वर, दयानंद, वालचंद, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सोमशंकर गेल्या 54 वर्षांपासून अखंडपणे करताहेत.

डब्यांचा प्रवास

सकाळी साडेसातपासून सोमशंकर यांच्या करजगी येथील घरी पालक त्यांच्या मुलाचा डबा, दशम्या पोच करतात. तेथील सर्व डबे घेऊन सोमशंकर यांचा त्यांच्या सायकलीवर प्रवास सुरू होतो. मंगरुळमार्गे तडवळ रेल्वेस्थानकापर्यंत जाताना वाटेत तीन ठिकाणी त्यांचा थांबा असतो. एका विशिष्ठ ठिकाणी पालक त्यांच्या मुलांचे डबे आणून ठेवतात (त्याला बोली भाषेत ‘ठिकाणा’ असे नाव त्यांनी ठेवले आहे). तडवळच्या स्टेशनवर सायकल लाऊन तेथून मग रेल्वेचा प्रवास सुरु होतो. सकाळची पॅसेंजर ट्रेन छोट्या स्थानकावरही थांबत असल्याने वाटेत लागणार्‍या मैसलगी, आळगी, शेगाव, मुंढेवाडी या गावांतही स्टेशनवरील विविध ‘ठिकाणा’वर पालकांकडून त्यांच्या मुलांचे डबे, दशम्या ठेवलेल्या असतात. ट्रेनमधून उतरून पुन्हा ते सारे डबे गोळा करत सोलापूरपर्यंतचा प्रवास पूर्ण होतो. सोलापूर स्थानकात त्यांनी दुसरी सायकल ठेवली आहे. त्यामुळे सोलापूर स्थानकापासून ते पुन्हा संगमेश्‍वर कॉलेज हॉस्टेल, नेहरु हॉस्टेल, दयानंद महाविद्यालय हॉस्टेल, वालचंद महाविद्यालय हॉस्टेल आणि जर इतर नोकरीनिमित्ताने कोणी कामावर असेल तर अशा एखाद दुसर्‍या लोकांचे डबे सायकलवर पोहोच होतात. त्याचवेळी आदल्या दिवशी दिलेला डबा गोळा करून सायंकाळी चार वाजताच्या पॅसेंजर ट्रेनने मोकळ्या डब्यांसह त्यांच्या परतीचा प्रवास सुरु होतो. सकाळी आठपासून ते सायंकाळी सातपर्यंत त्यांचा हा प्रवास अखंड सुरु असतो. मात्र त्यांच्या याच मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना पोटभर जेवण मिळते. रिकाम्यापोटी सैनिक लढू शकत नाही असे म्हणतात अगदी तसंच रिकाम्यापोटी शिकणेही कठीण. मात्र  सोमशंकर यांच्या या डबे पोहोचविण्याच्या कामामुळे करजगी ते तडळव, मुंढेवाडीपर्यंतच्या हजारो मुलांच्या पोटाचा आणि शिक्षणाचा प्रश्‍न सुटला.

सायकलने सुरुवात

करजगी, तडवळ यासारख्या गावांना सोलापूरशी जोडणारे ना व्यवस्थित रस्ते होते ना त्या रस्त्यावर वेळेवर एसटी बस होत्या. गावात दहावी-बारावीनंतर शिक्षणाची कुठेच सोय नव्हती. त्यामुळे पूर्वी क्वचितच विद्यार्थी पदवी शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहायचे. मात्र त्याबाबत एकदा करजगी गावातल्या चावडीवर याबाबत गंभीर चर्चा सुरु झाली आणि त्यावेळी अत्यंत गरीब घरातील 17 वर्षीय सोमशंकर याने करजगी, तडवळ ते सोलापूर असा सायकल प्रवास करून डबे पोहोचविण्याची जबाबदारी घेतली. अनेक वर्षे डबा पोहोचविण्याचे काम सातत्याने केल्यावर मग इतर गावांतूनही त्यांना विनंती व्हायला लागली आणि मग तडवळ ते सोलापूर हा रेल्वे प्रवासही सुरु झाला. आज तब्बल 50 पेक्षाही अधिक डबे सोमशंकर दररोज सोलापूरला आणतात. आजपर्यंत अपवादानेच केवळ आजारी असल्यावर त्यांनी तीन-चारदा डब्याला सुटी घेतली. मात्र सुटीमुळे मुलं उपाशी राहू नयेत म्हणून त्यादिवशी त्यांच्या थोरल्या  मुलाने डबा पोहोचविण्याचे काम केले.

खासदार, आमदारही डब्याचे लाभार्थी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे दयानंद महाविद्यालयात शिकत असताना पंचाक्षरी वाड्यात राहत होते. त्यांचा डबा सकाळी करजगीला यायचा आणि तेथून सोमशंकर हे सोलापूरपर्यंत डबा घेऊन म्हेत्रेंपर्यंत त्यांच्या वाड्यात पोहोचवायचे. तर खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे हे नेहरु हॉस्टेलला राहत असताना पानमंगरुळ येथून त्यांचा डबा घेऊन त्यांच्या हॉस्टेलपर्यंत पोहोचवायचे. आज भलेही दोघे काँग्रेस-भाजप अशा टोकाच्या विरोधी पक्षात असले तरी डबा पोहोचविताना सोमशंकर यांनी जसा जातीय भेद ठेवला नाही तसा पक्षीय भेदही ठेवला नाही.