Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Solapur › मर्जीतील कर्मचार्‍यांना कार्यमुक्‍त करण्यास टाळाटाळ

मर्जीतील कर्मचार्‍यांना कार्यमुक्‍त करण्यास टाळाटाळ

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 8:39PMसोलापूर : रणजित वाघमारे

आरोग्य सेवा सुरळीत सुरू रहावी. यासाठी उपसंचालकांनी विविध ठिकाणच्या कर्मचार्‍यांची सिव्हिल सर्जन कार्यालयात नियुक्‍तीचा आदेश काढला आहे.  मात्र नियुक्‍त केलेले कर्मचारी हे मर्जीतील असल्याने त्यांना त्या त्या कार्यालयातील कार्यालय प्रमुखांनी तीन महिने होत आले तरी कार्यमुक्‍त केले नाही. त्यांनी उपसंचालकांच्या आदेशाला सरळ केराची टोपली दाखवली आहे.

जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालय, सोलापूर येथून मेडिकल बिले, अपंग प्रमाणपत्रे, फिटनेस सर्टिफिकेट, काऊंटर  सिग्नेचर  व इतर महत्त्वाची प्रमाणपत्रे देण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर जिल्ह्यातील 14 ग्रामीण आणि 3 उपजिल्हा रुग्णालयांचा कारभारही सांभाळला जातो. परंतु, येथील कार्यालयात पदे मंजूर नसल्याने वरील सर्व कामकाज करण्यासाठी अडथळे येत आहेत. परिणामी आरोग्य सेवा कोलमडत आहे. त्यामुळे येथील कामकाज सुरळीत पार पाडावे. येथील प्रशासकीय अडचणी दूर व्हाव्यात.

यासाठी उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध रूग्णालयातून गट क मधील कर्मचार्‍यांची सेवाअधिगृहीत करण्याबाबत त्या त्या कार्यालयास 27 नोव्हेंबर 2017 रोजी आदेश दिला आहे. ज्यामध्ये सहा. अधीक्षक एन. एम. कुलकर्णी (आठवड्यातील 3 दिवस), वरिष्ठ लिपीक एम. एन. कदम, टी. डी. छप्परबंद आणि युनूस शेख (पूर्णवेळ) यांचा समावेश आहे. परंतु, हे कर्मचारी अधिकार्‍यांच्या मर्जीतील असल्याने तीन महिन्यांपूर्वी उपसंचालकांचा आदेश येऊनही कर्मचार्‍यांना वरिष्ठांनी  आजतागायत कार्यमुक्‍त केले नाही. यातील अधिकार्‍यांना आरोग्य सेवेपेक्षा स्वत:चा कारभार महत्त्वाचा वाटत असल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे उपसंचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने संचालक दोषींवर काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.