Wed, Mar 20, 2019 08:54होमपेज › Solapur › ग्रामसभेत विरोधक-सत्‍ताधाऱ्यांमध्ये हाणामारी 

ग्रामसभेत विरोधक-सत्‍ताधाऱ्यांमध्ये हाणामारी 

Published On: Aug 27 2018 9:00PM | Last Updated: Aug 27 2018 9:00PMमोहोळ : वार्ताहर  

ग्रामसभेत प्रश्न विचारण्याच्या व उत्तर देण्याच्या कारणावरुन गावपातळीवरच्या दोन गटात झालेल्‍या दगडफेकीत दोघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील २९ जणांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

याबाबत पहिल्या गटाचे विकास रामदास कोकाटे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी की, २७ ऑगस्ट रोजी तांबोळे (ता. मोहोळ) येथे सकाळी ११ वाजता ग्रामसभा होती.  या ग्रामसभेत विकास कोकाटे यांनी गावातील समस्या आणि विकास कामांबाबत सरपंच आणि ग्रामसेविका यांना प्रश्न विचारले. त्यांना उत्तरे देता येत नसल्याने सत्ताधारी गटाच्या काही लोकांनी विजय कोकाटे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी राहुल संभाजी कोकाटे, विकास शाहु इंगळे, सुधाकर लक्ष्मण चव्हाण यांनी त्यांना शिव्या देऊ नका म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्ताधारी गटातील बाबुराव भगवान कोकाटे, धनंजय रोहिदास कोकाटे, धनाजी चांगदेव डोंगरे, शिवराज सुधीर नरवडे, दत्तात्रय तानाजी डोंगरे, जनाबाई तानाजी डोंगरे, संतोष नागनाथ पवार, अरविंद शिवाजी डोंगरे, सागर भिवाजी डोंगरे, पोपट आजिनाथ हांडे, भरत आजिनाथ हांडे, रमेश लक्ष्मण चौगुले, आणि (अरविंद डोंगरे यांचा मेहुणा पूर्ण नाव माहित नाही) (सर्व रा. तांबोळे ता. मोहोळ) यांनी विकास कोकाटे यांच्यासह राहुल कोकाटे, विकास इंगळे, सुधाकर चव्हाण यांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच विकास कोकाटे यांच्या हातातील ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि १२ हजार रुपये किंमतीचे घड्याळ बळजबरीने काढून घेतले. यावेळी जनाबाई डोंगरे यांनी राहुल कोकाटे यांच्या करंगळीला चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी मोहोळ पोलिसात १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटाच्या वतीने सरपंच सुगंधा नवनाथ लोखंडे यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादी नुसार अधिक माहिती अशी की, सोमवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गावातील अंबिका मंदिर सभागृहात ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत सरपंच सुगंधा लोखंडे, ग्रामसेविका ठोंबरे यांच्या सह पोलिस कॉन्सटेबल जगताप, पोलिस कॉन्सटेबलवाघमारे उपस्थित होते. यावेळी गावातील विकास कोकाटे यांनी दलित वस्ती मधील सौर दिव्याच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला. यावेळी उपसरपंच शोभा हांडे यांचे पती पोपट हांडे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी विजय रामदास कोकाटे, शेखर देविदास चव्हाण, विकास शाहू इंगळे, महेश मधुकर इंगळे, सुधाकर लक्ष्मण चव्हाण, वैभव अभिमान कोकाटे, नितीन शिवाजी कोकाटे, राहुल संभाजी कोकाटे, निखिल भारत चव्हाण, समील शाहू इंगळे, प्रमोद कामराज कोकाटे, किसनकुमार नागनाथ कोकाटे, सोमनाथ अभिमन्यू कोकाटे, सुशांत महादेव रोकडे, सागर सुभाष कोकाटे, वैभव सुभाष कोकाटे (सर्व रा. तांबोळे ता. मोहोळ) यांनी "तू मध्ये बोलणारा कोण" असे म्हणून ग्रामसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी दगड आणि काठीने सत्ताधारी गटाच्या लोकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत आप्पासाहेब संदिपान कोकाटे यांच्या डोक्यात दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी १६ जणांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ. नितीन थेटे हे या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.