सोलापूर : करकंबच्या कोरोनाबाधित व्यक्तीचा बार्डीतील सासरा पॉझिटिव्ह

Last Updated: Jun 01 2020 7:45PM
Responsive image
करकंब येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्राची पाहणी करताना तहसिलदार वैशाली वाघमारे व तलाठी व्ही खडतरे


करकंब : पुढारी वृत्तसेवा  

करकंब येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बार्डी (ता.पंढरपूर) येथील त्याच्या सासऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आज बार्डी गावात घबराटीचे वातावरण पसरले होते. दरम्यान या रुग्णाच्या थेट संपर्कातील अठ्ठाव्वीस जणांना ताब्यात घेवून संस्थात्मक विलिगीकरणासाठी पंढरपूरला पाठविण्यात आले आहे.

पुण्यावरुन आलेला करकंब येथील एकजण कोरोनाबाधित आढळला होता. त्याच्या थेट संपर्कात आलेल्या करकंब आणि बार्डी येथील नातेवाईक असे एकूण ३० जणांचे संस्थात्मक विलिगीकरण करून त्यांचे व इतर ९ जणांचे तपासणीसाठी स्वॅब पाठविले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर ३८ जणांचे निगेटिव्ह तर बार्डी येथील एक जणाचा पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. 

आज सोमवारी तातडीने गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तुषार सरवदे, डॉ.प्रभा साखरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, तहसिलदार वैशाली वाघमारे आदींनी बार्डी गावास भेट देवून गाव पूर्ण बंद ठेवण्याच्या सुचना स्थानिक प्रशासनास दिल्या.

नविन रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या बार्डी येथील २६ व करकंब येथील दोन जणांना संस्थात्मक विलिगीकरणासाठी पंढरपूरला पाठविले आहे. तर कमी संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वॉरंटाईन केले जात आहे. 

पंढरपूर तालुक्यातील उपरी, गोपाळपूर,  करकंब नंतर आता बार्डी येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पंढरपूर तालुक्यातील इतर गावातही बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे. त्यांच्या संपर्कात गावातील व्यक्ती आल्या. तर गाव कोरोनाबाधित होईल याची गावकऱ्यांना भीती वाटत आहे. 

तीन तालुक्याच्या सिमेवरील बार्डी हादरली

आज कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णाच्या थेट संपर्कामध्ये बार्डी येथील तीन किराणा दुकानदार, एक दुधवाला, दोघेजण मोटारसायकलवर लिफ्ट दिलेले असल्याने आता पुढे काय होणार, या धास्तीने ग्रामस्थ हादरुन गेले आहेत. शिवाय सदर रुग्णास दारुचे व्यसन असल्याने तो करकंब येथे दोन ठिकाणी जावून मद्य पिऊन आला होता. ह्या दोन्ही ठिकाणच्या मद्यविक्रेत्यांनाही आज संस्थात्मक विलिगीकरणासाठी ताब्यात घेतले असून हे ह्या दोन्ही ठिकाणी अवैध दारु विक्री केली जात असल्याची चर्चा आहे.

होम क्वॉरंटाईन व्यक्ती बाहेर आढळल्याने  कारवाई

करकंबमध्ये १३८ व्यक्तींना होम क्वॉरंटाईन  व १०९ व्यक्तींना इन्स्टिट्यूशन क्वॉरंटाईन केले आहे. तर करकंब परिसरातील गावात एकूण ४१७ व्यक्तींना क्वॉरंटाईन केले आहे. त्यातील करकंब येथील एक व शेवते येथील एक व्यक्ती होम क्वॉरंटाईन असताना घरी आढळून आली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सपोनि प्रशांत पाटील यांनी दिली.