Fri, Apr 26, 2019 20:13होमपेज › Solapur › बळीराजाची धाकधूक वाढली; पेरणी केवळ 4 टक्के!

बळीराजाची धाकधूक वाढली; पेरणी केवळ 4 टक्के!

Published On: Jun 22 2018 2:04AM | Last Updated: Jun 21 2018 11:07PM सोलापूर ः महेश पांढरे

मृगाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेला पाऊस सलग दोन दिवस बरसला. पावसाची सुरूवात कित्येक वर्षांत पहिल्यांदाच वेळेवर झाल्याने शेतकरी सुखावला होता. यंदा खरिपाची पिके जोमाने येणार म्हणून शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.  परंतु मृग नक्षत्राच्या पहिल्या दोन दिवसांनंतर पावसाने सोलापूर जिल्ह्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे पेरणीच्या तयारीला लागलेला बळीराजा आता चिंतातूर झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आषाढातील वार्‍यानीदेखील शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे. ढगाळ  दिसणारे वातावरण वार्‍यामुळे पुन्हा निरभ्र होताना दिसत आहे. अशापरिस्थितीमुळे शेतकर्‍यांची धाकधूक वाढली आहे. याचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह बि-बियाणे, खत दुकानदारांवरदेखील जाणवत आहे. पावसाची सुरूवात चांगली झाल्यामुळे खत दुकानदारांनीही मोठ्या प्रमाणावर खतांची साठवणूक करुन ठेवली होती. परंतु आता बि-बियाण्यांसह खत खरेदीसाठी शेतकरी दमदार पावसाची वाट पाहात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी गतवर्षीचे धान्य बाजार समितीत घेऊन जाण्यास धजावत नसल्याचेही बाजार समितीतील धान्याच्या आवकवरून लक्षात येते. येत्या आठ दिवसांत पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्‍त होत आहे. आतापयर्र्ंत जिल्ह्यात केवळ 4 क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. त्या शेतकर्‍यांवरदेखील आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

 7 जूनला पावसाळा सुरु झाला असला तरी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 4 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.अक्कलकोट आणि मंगळवेढा तालुका वगळता इतर तालुक्यांत मात्र पेरण्या ठप्प झाल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र 7  लाख 917 हेक्टर आहे. त्यापैकी केवळ 3 हजार 114 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून यामध्ये अक्कलकोट तालुक्यात 25.14 हेक्टर, तर मंगळवेढा तालुक्यात 6 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. 

सुरुवातीला पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा पावसाळा चांगला असल्याची चाहुल शेतकर्‍यांना लागली होती. त्यामुळे खरिपांच्या पेरणीची जोरदार तयारी शेतकर्‍यांनी केली होती. त्यासाठी  जमिनीची मशागत आणि पेरणीसाठी लागणारे बियाणे आणि खते यांची खरेदीही शेतकर्‍यांनी करुन ठेवली होती. 
मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून केवळ उकाडा आणि उन्हाने त्रस्त करुन सोडले आहे. त्यामुळे पावसाचे पुनरागमन कधी होणार, याची उत्सुकता आता शेतकर्‍यांना लागून राहिली आहे. ऐनवेळी शेतकर्‍यांची तारांबळ होऊ नये यासाठी जिल्हा कृषी विभागानेही खरीप हंगामाची जोरदार तयारी केली होती. यासाठी जिल्हा कृषी विभागाच्यावतीने 76 हजार 540 मेट्रिक टन खतांची मागणी केली हेाती. त्यापोटी जिल्ह्यातील विविध खते पुरवठादारांकडे 51 हजार 456 मेट्रिक टनाचा पुरवठा झालेला आहे. यामध्ये प्राधान्याने युरिया, एमओपी, पोटॅश, संयुक्त खते सध्या पुरवठादारांकडे उपलब्ध आहेत. बियाण्यांसाठी 32 हजार क्विंटल मागणी केली होती. त्यापोटी 16 जूनपर्यंत 20 हजार 998 मेट्रिक टन बियाण्यांचा पुरवठा विविध कंपन्यांनी केला आहे. 
यामध्ये ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, मका, भुईमूग यासारखी बियाणे विविध दुकांनामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे खते आणि बियाणे मुबलकपणे उपलब्ध असले तरी सध्या पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी शेतीची कामे खोळंबून पडली आहेत. सहकारमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्याची गरज आहे. यंदा जर पावसाने ओढ दिली तर मात्र शहर व जिल्ह्याचा पाणीप्रश्‍न गंभीर होणार, यात शंका नाही.

एमआरपीपेक्षा अधिक पैसे देऊ नयेत ः कृृषी विभाग
सोलापूर जिल्ह्याला खते आणि बियाण्यांचा पुरवठा मुबलकपणे झाला आहे. सध्या पाऊस नसल्याने खरेदीचे प्रमाण कमी असले तरी अचानक पाऊस पडल्यानंतर खरेदीसाठी गर्दी वाढणार आहे. त्यावेळी चढ्या दराने खते आणि बियाण्यांचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी एमआरपीपेक्षा अधिक पैसे देऊ नयेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खते-बियाणे मुबलक; प्रतीक्षा केवळ पावसाची 
सोलापूर कृषी विभागाने मागणी केल्याप्रमाणे विविध पुरवठादारांकडे 51 हजार 456 मेट्रिक रासायनिक खते, तर 32 हजार क्विंटल विविध प्रकारच्या बियाण्यांचा पुरवठा कंपन्यांकडून झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खते आणि बियाणे मुबलक असून प्रतीक्षा केवळ पावसाची राहिली आहे.