Wed, Jul 24, 2019 14:10होमपेज › Solapur › शेतकर्‍यांच्या मावेजाचा प्रश्‍न अधांतरीच

शेतकर्‍यांच्या मावेजाचा प्रश्‍न अधांतरीच

Published On: Mar 10 2018 10:37PM | Last Updated: Mar 10 2018 10:22PMबार्शी : गणेश गोडसे

सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे-लातूर राज्यमार्गावरून दैनंदिन सुमारे 3 हजार 700 वाहनांची आवक-जावक होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आलेले असल्यामुळे व भविष्यातील वाहनांची संख्या लक्षात घेऊनच शासनाने या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतलेले आहे. असे असले तरी शेतकर्‍यांच्या मावेजाचा प्रश्‍न अद्याप अधांतरीच आहे.

हा रस्ता वाढून नेमका किती मीटर डांबरीकरण व  साईडपट्ट्यांसह तयार करण्यात येणार ही बाब अजूनही गुलदस्त्यातच आहे. रस्ता रूंदीकरणाच्या कामकाजासंदर्भात संबंधित जुन्या ठेकेदाराने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असल्यामुळे ही रूंदीकरणाची बाब न्याय कक्षेत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. मात्र हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्यात आलेला असल्यामुळे आता नेमके काय होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, खरे वास्तव हे रस्त्याच्या प्रत्यक्ष रूंदीकरणाच्या कामास सुरूवात झाल्यानंतर व जागा ताब्यात घेतल्यानंतरच समोर येणार आहे. प्रत्यक्ष रोड किती होणार या विचाराने अनेकांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला आहे. या मार्गाच्या रूंदीकरण कामाच्या पूर्ततेनंतर इतर अनेक मार्गांवरील वाहतूक या रस्त्याने वळणार असून येथील वाहतुकीच्या प्रमाणात मोठी वाढ होणार आहे. या भागात दळणवळणाच्या सुविधा वाढल्यामुळे पर्यायाने या भागाचा विकास साधण्यास मोठी मदतही होणार आहे. टेंभुर्णी-लातूर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम मार्गी लागल्यास पुणे-सोलापूर या मार्गावरील वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात या मार्गावर सुरू होणार असल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे. अंतराची मोठी बचत या मार्गामुळे होणार  असल्यामुळे वाहनधारकांमधून टेंभुर्णी-लातूर या मार्गास पसंती दिली जाणार आहे. 

मावेजाचे काय?
शासनाकडून असो अथवा खासगी कंपनीकडून शेतकर्‍यांच्या शेतात दूरवर हद्दीखुणा निश्‍चित करण्यासाठी दगड लावून व त्यांची रंगरंगोटी करून सीमा निश्‍चित करण्यात आली आहे.  दगडांची हद्द अनेकांच्या बंगला-घरांच्याही पाठीमागे गेलेली असून त्यांच्या जमिनी जागा ताब्यात घेतल्यानंतर संबंधितांना त्याचा मावेजा मिळणार का, असा प्रश्‍न संबंधित जागामालकांकडून विचारला जात आहे. यासंदर्भात संबंधितांकडे कोणतीच चौकशी अथवा विचारपूसही केली जात नसल्यामुळे अनेक वर्षांपासून स्थायिक असलेल्या घरमालकांमधून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.