Fri, Apr 26, 2019 03:58होमपेज › Solapur › बैलपोळ्याला शेतकर्‍याला आठवू लागली जितराबं

बैलपोळ्याला शेतकर्‍याला आठवू लागली जितराबं

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 8:56PMबार्शी : गणेश गोडसे 

यांत्रिकीकरणाचा मोठा परिणाम पशुधनावर झाला आहे. दिवसेंदिवस पशुधन संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. पशुधन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असल्या तरी त्याला म्हणावे असे यश मिळताना दिसून येत नाही.

वर्षभर बळीराजाला साथ देणार्‍या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सणाच्या आगमनाने यावर्षी शेतकरीराजाच्या डोळ्यात चक्क  पाणी उभे राहिले असून अनेक शेतकर्‍यांनी सर्वांसमक्ष अश्रुंना वाट मोकळी करून दिली. 

एरव्ही बैलपोळा सणाची आतुरतेने व मोठ्या प्रेमाने वाट बघणारा शेतकरी आपल्या उघड्या पडलेल्या दावणीकडे बघून धाय मोकलून रडतानाचे हृदयाला पिळवटून टाकणारे चित्र रविवारी बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागात निदर्शनास आले. सतत पडणार्‍या दुष्काळामुळे भरडला गेलेला व नाईलाजास्तव आपल्या दावणी कसायाकडे स्वाधिन केलेला शेतकर्‍याचा आपल्या सर्जा- राजाच्या आठवणीने कंठ दाटून आला आहे. 

बाजारपेठेत बैलांना सजविण्यासाठी थाटलेली मोठमोठी दुकाने पाहून तर शेतकर्‍यांना वेदना सहन कराव्या लागत होत्या. बैलपोळा सणाच्या आदल्या दिवशी खांदेमळणीचा दिवस असतो.कृषीप्रधान अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. पोळ्याच्या एक, दोन दिवस अगोदर खांदेमळणी केली जाते. बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळण्याची जुनी प्रथा आहे.शिंगांना व खुरांना धारदार शस्त्राने टोकदार करण्यात येते. बैलांकडून दोन दिवस कोणतेच काम करून घेतले जात नाही. बैलांना स्वच्छ धुवून नंतर चारुन घरी आणण्यात येते. मात्र यावर्षी वरूणराजाने अवकृपा दाखवल्यामुळे पशुधन संपुष्टात येते की काय अशी भीती आहे. पाऊसच नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न समोर उभा असताना नद्या-नाल्यामध्ये कुठले पाणी येणार. आपल्या मुक्या जितराबाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून केसारीमध्ये ‘भिलावा’ अडकावून पायांत अथवा शिंगांत गुंफले जाण्याची प्रथा आहे. मात्र जितराबच शिल्लक राहिले नसल्यामुळे भिलावा कुठे अडकवायचा या प्रश्‍नाने अनेकांच्या पोटात कालवल्यासारखे होताना दिसत होते. दिवसेंदिवस शेतकर्‍यांचा खरा सोबती असलेल्या सर्जा-राजाचे प्रमाण नगण्य होत चाललेले आहे. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे व निसर्गाच्या कोपामुळे पशुधन घटत चालले आहे. परिणामी शेकडोच्या कळपाचा धनी असलेल्या बळीराजाला दावणीत बांधण्यासाठीसुद्धा पशुधनच शिल्लक राहिले नाही. ज्यांच्याकडे पशुधनच नाही ते कुंभारवाड्यात जाऊन मातीची बैलजोडी विकत आणुन त्याची विधिवत पूजा करतात. ही वेळ  सरासरी 90 टक्के शेतकर्‍यांवर ओढावलेली आहे. उर्वरित ज्या शेतकर्‍यांकडे बैलजोड्या शिल्लक आहेत. त्यांची त्या मुक्या प्राण्यांना गोडधोड खाऊ घालण्याची क्षमता उरलेली नाही. ही शोकांतिका आहे.